Shiv sena members aggressive for president"s post | Sarkarnama

अध्यक्षपदासाठी पैठणचे 8 शिवसेना सदस्य आक्रमक, डावलल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

या परिस्थीती संदर्भात पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी अध्यक्षपदावर आम्ही दावा सांगितल्याचे कबुल केले. मात्र पक्ष ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असले. कुठल्याही परिस्थीतीत पक्षाच्या विरोधात बंडखोरी किंवा गद्दारी केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद:  पैठण तालुक्‍यात 8 पैकी  शिवसेनेचे सर्वाधिक 7 जिल्हा परिषद सदस्य विजयी झाल्यामुळे अध्यक्षपद पैठण तालुक्‍याला मिळावे अशी मागणी तालुक्‍यीतील सदस्यांनी पक्षाकडे केली आहे. "डावलल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल' असा इशारा देखील या सदस्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड चोवीस तासांवर आलेली असतांनाच शिवसेनेत बंडाची भाषा केली जात असल्याने या सदस्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु झाले आहेत. तर दुसरीकडे तुम्ही आमच्याकडे आलात तर अध्यक्षपद देतो असा शब्द भाजपकडून या सदस्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पैठण तालुक्‍यालाच मिळाले पाहिजे असा हट्ट तालुक्‍यातील शिवसेनेच्या सदस्यांनी धरला आहे. मनिषा सोलाट यांच्या नावासाठी सदस्यांनी आग्रह धरला असून अध्यक्षपद देणार नसाल तर आम्ही भाजप सोबत जातो असा पावित्रा घेत या सदस्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली असतांना शिवसेनेतच फूट पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

 पैठण तालुक्‍यातील शिवसेनेचे सदस्य गद्दारी करणार याची चर्चा जिल्ह्यात पसरल्यामुळे अध्यक्षपदा बाबतची उत्सूकता शिगेला पोचली आहे. शिवसेना व कॉंग्रेसचे सदस्य शनिवारीच स्वतंत्रपणे मुंबईला रवाना झाले होते. पैकी रविवारी शिवसेनेच्या सदस्यांना लोणावळ्याला नेण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेकडून अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची या संदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ सोलाट यांच्या पत्नी मनिषा सोलाट यांना अध्यक्ष करावे अशी मागणी सदस्यांनी बैठकीत लावून धरल्याची माहिती समोर आली आहे. 

भुमरे यांच्यावर संशयाची सुई

पैठण तालुक्‍यालाच अध्यक्षपद मिळाले पाहिजे या मागणी मागे आमदार संदीपान भुमरे यांचेच डोके असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी फारसे पटत नसलेल्या भुमरे यांनी सर्वाधिक सदस्य निवडू आणल्याचे श्रेय घेत अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बोलणी करुन शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील भुमरे करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघातील बराच भाग पैठण तालुक्‍यात येत असल्यामुळे या दोन नेत्यांमध्ये निवडणुकीच्या वेळी फ्रेंडली मॅच खेळली जाते असा आरोप देखील नेहमी केला जातो. 

दावा कायम, पण गद्दारी नाही

या परिस्थीती संदर्भात पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी अध्यक्षपदावर आम्ही दावा सांगितल्याचे कबुल केले. मात्र पक्ष ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असले. कुठल्याही परिस्थीतीत पक्षाच्या विरोधात बंडखोरी किंवा गद्दारी केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अध्यक्षपदासाठी मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याप्रमाणे आम्ही मागणी केल्याचे भुमरे म्हणाले.

शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसला उपाध्यक्षपद

पैठण तालुक्‍यातील शिवसेना सदस्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असला तरी त्यांची समजुत काढण्यात शिवसेनेच्या नेत्यांना यश आल्याचे कळते. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसला उपाध्यपद दिले जाणार आहे. या शिवाय दोन्हा पक्षाला प्रत्येकी दोन सभापतीपद देण्याचे निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख