Shiv sena congress unite to gain power | Sarkarnama

शिवसेना-कॉंग्रेस सदस्यांना रोखत भाजपचा रडीचा डाव-खैरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

खैरे यांनी शिवसेना-कॉंग्रेसच्या सदस्यांना मुद्दाम गेटवर अडवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव होता असा आरोप केला आहे.

औरंगाबाद: वारेमाप पैसा वाटून आणि फोडाफोडीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शिवसेना-कॉंग्रेसच्या सदस्यांना सभागृहातच येऊ द्यायचे नाही असा प्रयत्न सरकारी व पोलीस यंत्रणेला हाताशी धरून भाजपने केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

शिवसेना-कॉंग्रेसच्या सदस्यांना सभागृहात पोहचू न देता मतदान उरकून घेण्याचा रडीचा डाव भाजपने खेळला, पण आम्ही तो हाणून पाडल्याचा दावा देखील खैरे यांनी केला आहे. 

निवडणुक प्रकिया सुरु होण्याच्या सर्वात आधी सभागृहात भाजप व त्यांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादी, मनसे व रिपाइं (डेमोक्राटीक) पक्षाचे मिळून 28 सदस्य आले होते. एका खाजगी बसमधून या सदस्यांना थेट सभागृहाच्या गेटपर्यत पोहचवण्यात आले.

त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच पावणे तीनच्या सुमारास शिवसेना व कॉंग्रेसचे 34 सदस्य बसने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले. तेव्हा त्यांना बस आत घेऊन जाण्यास पोलीसांनी मज्जाव केला. त्यामुळे हे सगळे सदस्य चालत सभागृहाकडे निघाले. पोलीसांनी सभागृहाचे गेट आतून बंद करुन घेतले होते. प्रत्येक सदस्याने ओळखपत्र दाखवावे आणि मगच जावे असा आग्रह तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने केला.

यावरुन वादावादी सुरु झाली पण पोलीस कर्मचारी भूमिकेवर ठाम होते. मतदान प्रकिया सुरु होण्याची वेळ झाली तरी सभागृहाचे गेट उघडत नसल्याचे समजात अध्यक्षांच्या दालनात बसलेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे धावतच त्याठिकाणी आले आणि त्यांनी गेटवर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत गेट उघडण्यास भाग पाडले. हा गोंधळ सुरु असतांना कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झाबंड, माजी आमदार कल्याण काळे हे देखील तिथे दाखल झाले. 

भाजपकडे पैसा आला कुठून? 

या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी शिवसेना-कॉंग्रेसच्या सदस्यांना मुद्दाम गेटवर अडवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव होता असा आरोप केला आहे. यासाठी भाजपने सरकारी व पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचेही खैरे म्हणाले. संबंधित पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करण्याची मागणी आपण पोलीस आयुक्तांकडे केली आहे. भाजपने कॉंग्रेसचे सदस्य फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राष्ट्रवादी, मनसे व इतर सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी देखील भाजपने कोट्यावधी रुपये खर्च केले, त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख