Shiv sena agitates against government on farmer"s loan waiver | Sarkarnama

कर्जमाफीसाठी शिवसेना सरकार विरोधात रस्त्यावर  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

संघर्ष यात्रेमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर त्याचे श्रेय कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मिळू नये यासाठीच शिवसेनेने आंदोलनाचे नाटक केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. मुळात सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला कर्जमाफी देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय? तुम्ही सत्तेत आहात, जर तुमचं सरकार ऐकत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला देखील कॉंग्रेसच्या मंडळीकडून शिवसेनेला दिला जात आहे.

औरंगाबाद :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आठवडाभरापुर्वी काढलेल्या चांदा ते पनवेल दरम्यानच्या संघर्ष यात्रेनंतर आता शिवसेना देखील रस्त्यावर उतरली आहे. औरंगाबादेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत शेकडो शिवसैनिकांना सोमवारी (ता.10)धरणे आंदोलन सुरु केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपुर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आपल्याच सरकार विरोधात शिवसेनेने सुरु केलेल्या या आंदोलनाची शहरवासियामध्ये चर्चा होती. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरुन शिवसेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात राहिल्यामुळे या धरणे आंदोलना संदर्भात सर्वसामान्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मुळात शिवसेनेने कर्जमाफीसाठी एवढ्या उशीरा आंदोलन का केले? अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत बोलतांना "शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका' असे विधान केले होते. याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेने गंगापूर-खुल्ताबाद या बंब यांच्या मतदारसंघात केल्याचे बोलले जाते. दोन दिवसांपासून या दोन्ही तालुक्‍यामध्ये शिवसेनेने बंब यांच्या विरोधात व 
कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे देत आंदोलन छेडले होते. 

विरोधकांकडून आंदोलनाची खिल्ली 
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने सुरु केलेल्या धरणे आंदोलनाची कॉंग्रेससह इतर पक्षांनी खिल्ली उडवली आहे. संघर्ष यात्रेमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर त्याचे श्रेय कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मिळू नये यासाठीच शिवसेनेने आंदोलनाचे नाटक केल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. मुळात सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला कर्जमाफी देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय? तुम्ही सत्तेत आहात, जर तुमचं सरकार ऐकत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला देखील कॉंग्रेसच्या मंडळीकडून शिवसेनेला दिला जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर सभागृहात अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी धमकी देणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी शेपूट घातल्याची टीका देखील कॉंग्रेसकडून होत आहे. विधानभवन परिसरात सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून विरोधकांनी भाजप सरकारचा निषेध केला होता. शिवाय संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असल्याने शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे. 

अडीच वर्ष काय केले? 

उत्तर प्रदेशात सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. जे योगींना जमले ते महाराष्ट्राच्या फडणवीसांना का जमू शकले नाही? असा सवाल शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी केला. योगी सरकारने कर्जमाफी कशी दिली याचा अभ्यास आता फडणवीस सरकार करत आहे, मग अडीच वर्ष काय केले? अशी टिका देखील सिरसाट यांनी यावेळी केली. 

भाजपचे वेट ऍन्ड वॉच 

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरुन शिवसेनेने क्रांतीचौकात केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार विरोधात शिवसेनेने केलेल्या या आंदोलनाकडे भाजपने मात्र वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेतून पहायचे ठरवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेली भविष्यात आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सरकारमध्ये असून देखील सातत्याने विरोधात व भाजपला अडचणीत आणण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख