डॉ. दीपक सावंतानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव ?

 डॉ. दीपक सावंतानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव ?

मुंबई : सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सादर केल्याने शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी डॉ. सावंत यांचा राजीनामा मंजूर केला तर उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर गंडांतर येण्याची शक्‍यता आहे. 

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे सलग दोनवेळा प्रितनिधीत्व केलेले सावंत यांना यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. शिवसेनेने सावंत यांच्याऐवजी बोरिवलीचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. पोतीनीस यांच्या नावाची घोषणा होताच सावंत यांनी पक्षनेतृत्वाकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. नेतृत्वाने हा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. 

भाजपसोबतच्या सत्तेत शिवसेनेच्या वाट्याला पाच कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. मात्र, एकनाथ शिंदे वगळता मंत्रिपदावर विधानपरिषद सदस्यांची वर्णी लावण्यात आली. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांबद्दल पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभेवर निवडून आलेल्या सदस्याला मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी आमदारांची जुनी मागणी आहे. मध्यंतरी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत सेना आमदारांनी या मंत्र्यांच्या विरोधात सूर लावत विधानसभेतील आमदाराला मंत्रिपद देण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी ठाकरे यांनी आमदारांच्या भावनेशी सहमती दर्शवली होती. 

विधानसभा निवडणुकीला अवघे दीड वर्ष शिल्लक असल्याने शिवसेनेत फेरबदलाच्या हालचाली सुरू आहेत. या फेरबदलात सुभाष देसाई, दिवाकर रावतेंसारख्या ज्येष्ठांना पक्ष कार्यासाठी मोकळेकरून मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांना संधी देण्याचा विचार शिवसेनेकडून होऊ शकतो. रवींद्र वायकर, विजय शिवतारे या राज्यमंत्र्यांना बढती देऊन त्यांच्या जागी आमदाराला संधी दिली जाऊ शकते. सावंत यांचा राजीनामा मान्य झाला तर शिवसेना मंत्र्यांमधील खांदेपालट अटळ असल्याने शिवसेनेतील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

अधिवेशनाआधी मंत्रिमंडळचा विस्तार? 
भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषि, फलोत्पादन खात्याला स्वतंत्र मंत्री नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनात शेतकर्यांचे मुद्दे उपस्थित होणार असल्याने अधिवेशनापूर्वी कृषि खात्यासाठी मंत्री दिला जाऊ शकतो. त्यामुळे फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा भरताना मंत्रिमंडळचा विस्तार अथवा फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com