शिरूर तालुक्यात चुरशीने मतदान; आढळरावांचा चौकार की कोल्हेंचा रिव्हर्स स्विंग?

शिरूर तालुक्यात चुरशीने मतदान; आढळरावांचा चौकार की कोल्हेंचा रिव्हर्स स्विंग?

शिरूर ः शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील चुरस आज मतदानातही दिसून आली.

तालुक्‍याच्या शहरी व ग्रामीण भागातील मतदारांनी संमिश्र कौल नोंदविल्याचे, तालुक्‍याच्या विविध भागात सहज फेरफटका मारला असता प्रकर्षाने जाणवले. उन्हाचा कडाका असूनही शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिवाजी आढळराव व डॉ. कोल्हे यांच्यासह 23 उमेदवार "खासदार' होण्यासाठी रिंगणात उतरले असून, प्रत्येकाने आपापल्या परीने शिरूर तालुक्‍याच्या परिसर पिंजून काढला. आढळराव व डॉ. कोल्हे हे मतदारांच्या भेटीगाठी, पदयात्रा, रोड शोच्या निमीत्ताने तालुक्‍यात किमान तीन ते चार वेळा येऊन गेले.

शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे व बहुजन मुक्ती पार्टीचे श्रीकांत चाबुकस्वार हे शिरूर तालुक्‍यातीलच असल्याने त्यांनी स्थानिक मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. स्थानिकांच्या गाठीभेटीवर त्यांनी मोठा भर दिला होता. वंचित विकास आघाडीचे राहुल ओव्हाळ यांनीही तालुक्‍याच्या काही भागाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यामुळे आढळराव व डॉ. कोल्हे यांच्यासह घाडगे, चाबुकस्वार व ओव्हाळ या उमेदवारांचे कार्यकर्ते तालुक्‍याच्या विविध भागात मतदान प्रक्रियेदरम्यान आढळले. 

तालुक्‍याच्या बहुतांश भागात आढळराव व कोल्हे यांच्यातच चुरस दिसून आली. या सरळ लढतीत मतदारांनी संमिश्र कौल नोंदविल्याचेही काही मतदारांशी संवाद साधताना स्पष्टपणे जाणवले. गतवेळच्या निवडणुकीत, मोदी लाटेवर स्वार होत एकतर्फी विजय नोंदविणाऱ्या आढळराव यांनी सुमारे तीन लाखाच्या फरकाने नेत्रदीपक विजय संपादन केला होता. मात्र, डॉ. कोल्हे यांच्यासारखा प्रभावी चेहरा यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभा ठाकल्याने व लोकप्रियतेच्या बाबतीत तो उजवा असल्याने अनेक ठिकाणी त्यांना "पसंती' मिळाल्याचे जाणवले. त्यामुळे आढळरावांच्या एकतर्फी मताधिक्‍क्‍याला यंदा काही प्रमाणात "ब्रेक' लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

गेली साडेचार वर्षे भाजप - शिवसेना हे टोकाचे प्रतिस्पर्धी असल्यासारखे वागले. त्याचेही पडसाद मतदानादरम्यान काही ठिकाणी दिसून आले. हे राजकीय ध्रुवीकरण झालेले असले; तरी आढळरावांच्या सलग तीन निवडणूकांमुळे त्यांच्याशी बांधला गेलेला एक ठराविक मतदार वर्ग निर्माण झाला असून, या पारंपरिक मतदाराला, नवमतदारांचीही मोठी साथ लाभल्याचे मतदान प्रक्रियेदरम्यान दिसून आले. "दादांना (आढळराव) मत, म्हणजेच मोदींना मत' हा शिवसेनेने अखेरच्या टप्प्यात केलेला प्रचारही त्यांच्यादृष्टीने फलदायी ठरल्याचे मतदारांशी चर्चा करताना जाणवत होते. अखेरच्या टप्प्यात युती होऊनही भाजप कार्यकर्त्यांनी "देश का नेता आणि सबका साथ, सबका विकास' डोळ्यासमोर ठेवून कुठलीही अहमहमिका न ठेवता आढळराव यांच्यासाठी नेटाने व जिद्दीने प्रचार यंत्रणा राबविल्याने युतीच्या बाजूने सुप्त लाट दिसून आली. 

आज झालेल्या मतदानानंतर, ठोकून मतदान झाल्याचा दावा छातीठोकपणे दोन्ही बाजूंनी केला जाऊ लागला असून, विजयाचे दावे केले जात आहेत. "आम्हीच जिंकणार' अशी आव्हाने - प्रतिआव्हाने आत्तापासूनच दिली जाऊ लागली असून, आढळराव व डॉ. कोल्हे यांच्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर लाखो रूपयांच्या पैजा देखील लावण्यात आल्या आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वगळता सामान्य मतदारांकडून, "मतांचा कौल कुणाच्या बाजूने' याबाबत प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगली जात असल्याने "निकाल' कुणाच्या बाजूने लागणार याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com