उद्धवजी प्रत्येकवेळी आमदारांना विश्‍वासात घेत होते - संजय शिरसाट

खोटारडेपणा आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी बंडखोरांना उभे करून त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपला धडा शिकवायाचाच ही भावना प्रत्येक आमदारांच्या मनात होती. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करणार हे कळाल्यावर प्रत्येक आमदाराच्या आनंदाला उधाण आले होते. त्यानंतर पाठिंब्याचे पत्र नसल्याने सत्ता स्थापन करता आली नाही हे स्पष्ट झाल्यावरही आमच्यात नाराजीची भावना नव्हती. कारण आता सत्ता स्थापनेसाठी पुरेसा वेळ मिळणार होता असेही शिरसाट यांनी सांगितले.
उद्धवजी प्रत्येकवेळी आमदारांना विश्‍वासात घेत होते - संजय शिरसाट

औरंगाबाद : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सगळेच वरिष्ठ नेते आमदारांना विश्‍वासात घेऊन, आमची मते जाणून घेत प्रत्येक पाऊल टाकत होते. भाजपच्या खोटारडेपणाबद्दल आमच्या मनात चीड होती, त्यातूनच राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. भाजपला धडा शिकवायचा ही प्रत्येक शिवसेना आमदार आणि शिवसैनिकांची इच्छा होती आणि त्या दृष्टीनेच गेल्या आठवडाभरात नेत्यांची वाटचाल सुरू होती अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सहा दिवसांतील मुंबईच्या हॉटेलमधील घडामोडींचा अनुभव सरकारनामाशी बोलतांना सांगितला. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या नव्या आघाडीने सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. मुंबईतील हॉटेलात असलेल्या शिवसेना आमदारांना काल आपापल्या मतदारसंघात परतण्याची परवानगी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. त्यांनतर औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट हे देखील मतदारसंघात परतले. गेल्या आठवडाभरा मुंबईत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल त्यांच्याशी बातचीत केली असता संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेचे सगळे आमदार हॉटेलची लॉबी किंवा आपापल्या रुममध्ये बसून होते. बाहेर काय घडतंय याची माहिती आम्हाला देखील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधूनच मिळत होती. शिवसेनेचे नेते आवश्‍यक वाटेल तेव्हा आमदारांपर्यंत काही माहिती पोहचवायचे, धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आमच्याशी येऊन चर्चा करायचे, मते जाणून घ्यायचे. आदित्य ठाकरेंनीदेखील सगळ्या आमदारांशी हॉटेलात येऊन चर्चा केली होती. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा किंवा बोलणी करतांना आमदरांचे मत जाणून घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल टाकले जात नव्हते. मिडियाशी बोलण्यास आम्हाला मनाई करण्यात आली होती. केवळ आमदारच नाही तर शिवसेनेच्या अन्य प्रवक्‍त्यांना देखील हे बंधन घालण्यात होते. उत्साहाच्या भरात एखादे चुकीची विधान कोणी करू नये ही यामागची भूमिका होती असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. 

जबाबदाऱ्या ठरल्या होत्या.. 
सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेले प्रयत्न, राष्ट्रवादी-कॉंग्रेस नेत्यांशी चाललेली बातचीत यातील कुठली माहिती प्रसारमाध्यमांना द्यायची, कुणी द्यायची याच्या जबादाऱ्या ठरवून देण्यात आल्या होत्या. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर मिडियाची जबादारी सोपवण्यात आल्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्‍त इतर कुणीही पक्षाची भूमिका मांडू शकत नव्हते. 
याशिवाय राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या नेत्यांशी कुठल्या विषयावर कोणत्या नेत्याने बोलायचे हे देखील ठरलेले होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिलिंद नार्वेकर यांची देखील या सगळ्या घडामोडीत महत्वाची भूमिका होती. राजभवनावर जेव्हा शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केल्याची माहिती आम्हाला हॉटेलमध्ये कळाली तेव्हा एकमेकांना पेढे, लाडू भरवत आम्ही आनंद साजरा केला. 

खोटारडेपणा आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी बंडखोरांना उभे करून त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपला धडा शिकवायाचाच ही भावना प्रत्येक आमदारांच्या मनात होती. त्यामुळे शिवसेना सरकार स्थापन करणार हे कळाल्यावर प्रत्येक आमदाराच्या आनंदाला उधाण आले होते. त्यानंतर पाठिंब्याचे पत्र नसल्याने सत्ता स्थापन करता आली नाही हे स्पष्ट झाल्यावरही आमच्यात नाराजीची भावना नव्हती. कारण आता सत्ता स्थापनेसाठी पुरेसा वेळ मिळणार होता असेही शिरसाट यांनी सांगितले. 

17 नोव्हेंबर महत्वाचा दिवस.. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी 17 नोव्हेंबरला आहे. त्यादिवशी पुन्हा शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत जमणार आहेत, तसे आदेशच पक्षप्रमुखांनी दिले आहेत. हा दिवस प्रत्येक शिवसैनिकासाठी महत्वाचा आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा मुहूर्त याच दिवशी लागण्याची शक्‍यता देखील संजय शिरसाट यांनी यावेळी वर्तवली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com