शिर्डी, शनि शिंगणापूर, मोहटादेवी देवस्थाने दर्शनासाठी बंद

जिल्ह्यातील गावोगावच्या देवस्थानाजवळ यात्रा उत्सव नियोजित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेक सर्वचयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिलमध्ये बहुतेक यात्रा होत असतात. या यात्राही बंद करण्याचा निर्णय बहुतेक ग्रामपंचायतींनी घेतलाआहे.
shirdi, shani shingnapur temple shutdown for devotees
shirdi, shani shingnapur temple shutdown for devotees

नगर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साईबाबांची शिर्डी, शनिदेवाचे शिंगणापूर, मोहटा देवी, देवगड आदी देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर लहान देवस्थानांनीही काळजी घेत यात्रा, उत्सव बंद केले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेक सर्वच उत्सव बंद ठेवण्यात आले आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा खूप परिणाम जाणवत नसला, तरी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातून यापूर्वी पाठविलेल्या संशयित रुग्णांच्या तपासण्यांचे काही रिपोर्ट येणे बाकी आहे. जे आले ते निगेटिव्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कुठेही गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाने मोठी काळजी घेतली आहे. प्रमुख सर्व शहरातील शाळा यापूर्वीच बंद झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे लग्नकार्य, विविध उत्सव आदींवरही बंधने घालण्यात आली आहेत.

शिर्डी भाविकांना बंद
नगर जिल्ह्यात साईबाबांची शिर्डी हे देवस्थान जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. जगभरातून भाविक येत असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांची विशेष नोंद घेतली जात आहे. तसेच आजपासून बाबांचे दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांना तसे आवाहन केले आहे. आज दुपारी तीन वाजेपासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे. पुढील सुचना मिळेपर्यंत हीच स्थिती असेल. याबरोबरच शिर्डीतील साई भक्त निवास, साई प्रसादालयही बंद करण्यात आल्याचे साई मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. 

शनी शिंगणापूरमध्ये शुकशुकाट 
शनिदेवाचे मुख्य ठिकाण असलेले शिंगणापूर येथे मागील आठ दिवसांपासून गर्दी एकदम रोडावली होती. आज मात्र दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. शिर्डी पाठोपाठ शिंगणापूरही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे कमीत झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी बाहेरील भाविक येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून मोठी देवस्थाने दर्शनासाठी ठेवण्यात बंद ठेवण्यात आली आहेत.

मोहटादेवी, मढी येथील उत्सव रद्द 
नगरच्या दक्षिण भागातील मोहटादेवी, तसेच मढी येथील कानिफनाथ देवस्थानजवळील यापुढील सर्व उत्सव रद्द करण्यात आले आहेत. मोहटा देवी दर्शनासाठी बंद असल्याचे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मढी येथील पुढील यात्रा बंद ठेवण्यात आली असून, समाधीला थेट स्पर्श करून दर्शन घेण्यास बंदी करण्यात आली आहे. सध्या मढी येथील यात्रा सुरू आहे. मढी देवस्थान हे भटक्यांची पंढरी म्हणून समजले जाते. राज्यभरातून भटक्या समाजातील लोक येतात. विषाणुची बाधा एकमेकांपासून होऊ नये, यासाठी दर्शनासाठी देवस्थानच्या वतीने खास काळजी घेतली जात आहे. यापुढील यात्राही बंद ठेवण्यात आली असून, पुढे गुढीपाडव्यापर्यंत होणारे सर्व उत्सव बंद ठेवण्यात आले आहेत. पुढील सुचना येईपर्यंत दर्शनही बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे.

देवगडची सर्व दरवाजे बंद
नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील सर्व दरवाजे आज बंद करण्यात आले. याबाबत देवस्थानच्या वतीने पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. संस्थानचे पुढील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे व इतर सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

भैरवनाथांचे अन्नछत्र बंद
आगडगाव येथील प्रसिद्ध भैरवनाथ देवस्थानचे अन्नछत्र या महिन्यात बंद ठेवण्यात आले आहे. येथे प्रत्येक रविवारी सुमारे आठ ते दहा हजार भाविक बाजरीची भाकरी व आमटीचा महाप्रसाद मोफत घेतात. यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर मागील रविवारी आवाहन करून देवस्थान ट्रस्टने पुढील येणाऱ्या रविवारचा उपक्रम रद्द करण्यात आला असून,यापुढील सुचना येईपर्यंत अन्नछत्र बंदच राहणार असल्याचे कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com