राज्यमंत्री दादा भुसेंनी कचरा उचलला; कार्यकर्त्यांनी तो महापालिकेत टाकला

Shivsena Dada Bhuse Clearing Dustbin in Malegaon
Shivsena Dada Bhuse Clearing Dustbin in Malegaon

मालेगाव  : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शहरात सांडपाणी व घाणीने शहरवासिय त्रस्त आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई व विविध साथ आजार वाढत आहेत. डेंगी, मलेरिया, थंडी, ताप, न्युमोनिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी २५ ऑक्टोबरला मनपा आयुक्तांच्या दालनात आरोग्य व स्वच्छता अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन शहरातील स्वच्छतेबाबत सुचना दिल्या होत्या. मात्र, ढिम्म प्रशासन हलले नाही. अखेर काल सटाणा नाका भागात राज्यमंत्री भुसे यांनीच केराची टोपली हातात घेत स्वच्छता केली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रभाग १ च्या कार्यालयासमोर कचरा आणून टाकला.

भुसे सोमवारी सकाळी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ओझर येथे जाण्यास निघाले. सटाणा नाक्यावरील ॲरोमा चौकातच त्यांना कचऱ्याचे मोठे ढिगारे नजरेस पडले. गाडीतून उतरत त्यांनी लोखंडी पाटी घेऊन कचरा भरण्यास सुरुवात केली. कार्यकर्ते जमा झाले. भुसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंद प्रभाग कार्यालयासमोर कचरा टाकला. श्री. भुसे दौऱ्यावर रवाना झाले. कार्यकर्त्यांनी प्रभागासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाला वारंवार सूचना करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी मनपा प्रभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रभाग अधिकारी सुनील खडके, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. शहरात ठिकठिकाणी फवारणी करण्यात येईल. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजण्यात येतील. जागोजागी असलेला घाण कचरा तातडीने उचलण्यात येईल असे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनात प्रभाग सभापती राजाराम जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, उपमहानगरप्रमुख अमोल चौधरी, हर्षल अहिरे, संजय साबळे, बाळासाहेब पाटील आदींसह नागरीक, रिक्षा स्टॉपवरील पदाधिकारी सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com