मनोमीलनासाठी महायुतीची धडपड! भाजप-शिवसेनेत बैठकींचे सत्र सुरू

माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासहित कुटुंबीय भाजपत दाखल झाल्यानंतर नवी मुंबईतील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत; मात्र गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात काम केल्यानंतर अचानक एकत्र काम करणे नेत्यांसहित कार्यकर्त्यांनाही अवघड जात आहे. त्याकरिता काही नगरसेवकांना बोलावून बेलापूरमध्ये सहकार्य करण्याची तंबी नाईक गटाकडून दिल्याचे समजते.
Navi Mumbai Municipal Corporation
Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई  : भाजप-शिवसेनेत अलीकडे झालेल्या नेतेमंडळींच्या भरतीमुळे गेली अनेक वर्षे विरोधात काम करीत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मनोमीलन करण्यासाठी रविवारी दिवसभर नेतेमंडळींकडून बैठकींचे सत्र सुरू होते.

माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासहित कुटुंबीय भाजपत दाखल झाल्यानंतर नवी मुंबईतील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत; मात्र गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात काम केल्यानंतर अचानक एकत्र काम करणे नेत्यांसहित कार्यकर्त्यांनाही अवघड जात आहे. त्याकरिता काही नगरसेवकांना बोलावून बेलापूरमध्ये सहकार्य करण्याची तंबी नाईक गटाकडून दिल्याचे समजते.

एकेकाळी त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दशरथ भगत आणि दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. भगत यांच्या या प्रवेशामुळे भाजप आणि नाईकांना विरोध करणारे कॉंग्रेसचे पाच नगरसेवक, एक माजी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून काम करावे लागणार आहे.

नाईकांनी ज्या वेळी भाजपत प्रवेश केला, तेव्हा नाईकांसोबत ५६ नगरसेवकांनी प्रवेश केला. परंतु या सर्व नगरसेवकांनी गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेना आणि भाजपच्या विरोधात काम केल्यामुळे आता एकत्र काम करण्यात अडचणी येत आहेत. प्रवेश केल्यानंतरही काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मंडळींना स्वीकारलेले नाही; तर भाजपत आल्यानंतरही काही पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्वीचा रुतबा विसरलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. 

निवडणुकीच्या वातावरणात ही धुसफूस महागडी ठरू नये, याकरिता नाईक समर्थकांची रविवारी एक बैठक पार झाली. या बैठकीत ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभे राहून दिवसरात्र काम करण्याची तंबी देण्यात आली. तसेच भाजपच्या जुन्या पदाधिकारी व नेत्यांनाही नव्या कार्यकर्त्यांना व उमेदवारांना सहकार्य करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे समजते.

१० ऑक्‍टोबरला मनोमीलन मेळावा
महायुतीमध्ये कोणी एकमेकांवर नाराज नाही; मात्र कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधील एकोपा वाढवण्यासाठी येत्या गुरुवारी, १० ऑक्‍टोबरला वडार भवन येथे कार्यकर्त्यांचा मनोमीलन मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात भाजपच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासहित भाजप व शिवसेनेचे सर्व कडवे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षातर्फे वरिष्ठ नेते पाठवण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com