Shetkari Sanghtna burnt effigy of Arundhati Bhattacharya in Nagpur | Sarkarnama

रिझर्व बॅंकेसमोर अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर बॅंकांची आर्थिक स्थिती बिघडते, असा युक्तीवाद करणाऱ्या स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांनी उद्योजकांना कर्जमाफी कशी दिली- राजू शेट्टी

नागपूर - स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज नागपुरातील संविधान चौकात असलेल्या रिझर्व बॅंकेच्या समोर स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी विदर्भातील विविध ठिकाणी अनेक संघटनांनी रविवारी अन्नत्याग आंदोलन केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार शेट्टी आले होते. मुंबईला परत जाताना त्यांनी नागपुरात अरुंधती भट्टाचार्य यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रवी तुपकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

उद्योजकांची कर्जमाफी कशी होते?
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर बॅंकांची आर्थिक स्थिती बिघडते, असा युक्तीवाद करणाऱ्या स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य यांनी उद्योजकांना कर्जमाफी कशी दिली, असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखी असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते, या आश्‍वासनाची पूर्तता करावी, असेही खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख