शेतकरी संघटनेचा "स्वतंत्र भारत पक्ष' उतरणार नव्या दमाने निवडणुकीच्या मैदानात

शेतकरी संघटनेचा "स्वतंत्र भारत पक्ष' उतरणार नव्या दमाने निवडणुकीच्या मैदानात

अकोला : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर रान पेटवित पश्‍चिम विदर्भात युवकांची संघटनशक्ती वाढविण्यावर शेतकरी संघटनेने भर दिला असून युवाशक्तीच्या जोरावर आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर तडगे आव्हान उभे करण्याची रणनिती आखण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक आंदोलने करून शेतकरी संघटनेने पश्‍चिम विदर्भात शेतकऱ्यांचे मजबुत संघटन तयार केले होते. मात्र, संघटनेत सुरू झालेल्या कुरघोडीचे राजकारणामुळे संघटनेला फार काळ सुगीचे दिवस राहिले नाहीत. चार-पाच वर्षापुर्वी तर संघटनेचे अस्तित्व नसल्याचे दिसून येत होते. मात्र, वर्षभरापासून शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत झालेल्या फेरबदलानंतर संघटना पुन्हा सक्रीय झाली आहे. 

जिल्ह्यात धनंजय मिश्रा, ललित बहाळे, अविनाश नाकट, विलास ताथोड, डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रविण गायगोळ या नव्या दमाच्या नेतृत्वाने संघटनेची धुरा खांद्यावर घेत संघटनेची ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट करण्यास सुरूवात केली आहे. आगामी निवडणुक संघटनेला प्रस्थापित पक्षांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे युवकांचे सक्षक्त संघटन आवश्‍यक आहे. त्यासाठी विविध आंदोलने, चर्चासत्रे, मार्गदर्शन मेळाव्यांच्या माध्यमातून युवाशक्ती जोडण्याचे काम शेतकरी संघटनेनेकडून करण्यात येत आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर फोकस करीत जिल्ह्यातील ग्रामीण भाग पिंजून काढत शेतकरी संघटनेकडून गावो-गावी शाखा स्थापन करण्यात येत असुन युवा नेतृत्वावर जबाबदाऱ्या टाकण्यात येत असल्याने आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटना इतर पक्षांचे राजकीय गणित बिघडविण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com