पक्षनेतृत्वाच्या थंडपणाचा नसीम खान यांना फटका 

चार वेळा येथून आमदार झालेले नसीम खान यांना पक्षनेतृत्वाच्या थंडपणाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएमने दहा हजार मते घेतल्याने नसीम खान यांना जेमतेम चारशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
पक्षनेतृत्वाच्या थंडपणाचा  नसीम खान यांना  फटका 

मुंबई : विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पश्‍चिम आणि कलिना या मतदारसंघांत अपेक्षेप्रमाणे युतीच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली; मात्र वांद्रे पूर्वमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.

विलेपार्ले भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, येथे अपेक्षेप्रमाणे आमदार पराग अळवणी यांनी सहज विजय मिळवला. वांद्रे पश्‍चिमेलाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. शिक्षण मंत्री आशीष शेलार यांचा अभेद्य गड भेदण्यात विरोधी पक्षांना यश आले नाही. 

चांदिवलीत शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी दोन वेळा आमदार आणि मंत्री राहिलेल्या कॉंग्रेसच्या नसीम खान यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या प्रकारे शिवसेनेचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर आणि बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांच्यातील वादाचा फायदा कॉंग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांना झाला. बंडखोरीची तलवार म्यान न झाल्यास हेच चित्र पालिका निवडणुकीतही दिसेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

 कुर्ल्यात मंगेश कुडाळकर, तर कलिनामध्ये संजय पोतनीस या शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचे बालेकिल्ले राखले. कुर्ल्यात शिवसेनेची बांधणी व कुडाळकर यांनी केलेली कामे त्यांच्या उपयोगास आली.

यातील एकाही प्रभागात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्व नसल्याने मतदारसंघांवर युतीचेच वर्चस्व पुन्हा पाहायला मिळाले. युती झाल्याचा फायदा शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना झाला. कॉंग्रेस उमेदवारांच्या मतांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी प्रभावी नेतृत्व नसल्याचा फटका त्यांना बसला.


वांद्रे पूर्वची निवडणूक शिवसेनेप्रमाणे कॉंग्रेससाठीही महत्त्वाची होती. वांद्रे पूर्व येथून कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उत्सुक होते; मात्र या सर्वांना बाजूला सारत बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशानला उमेदवारी देण्यात आली.

याबाबत मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेले हज समितीचे सदस्य हाजी इब्राहिम शेख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अशा स्थितीत समोर तगडे आव्हान असतानाही वरिष्ठांची मर्जी मिळवत बाबा सिद्दिकी आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले आणि अनपेक्षितपणे झिशानच्या गळ्यात आमदारकीची विजयी माळ पडली.

चांदिवलीत कॉंग्रेसचा पराभव अनपेक्षित होता. शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनीदेखील विजयासाठी कसून प्रयत्न केले होते. चार वेळा येथून आमदार झालेले नसीम खान यांना पक्षनेतृत्वाच्या थंडपणाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएमने दहा हजार मते घेतल्याने नसीम खान यांना जेमतेम चारशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

मुंबईत अमराठी मतदारांची आपल्यालाच साथ मिळणार, या गैरसमजातून कॉंग्रेसचे मुंबईतील नेते गाफील राहिले. त्या हिशेबानेच युतीने रणनीती आखल्याने त्याचा अपेक्षित परिणाम उत्तर मध्य मुंबईत पाहायला मिळाला.

गेल्या पाच वर्षांत केंद्रात भाजपची; तर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. त्यामुळे युतीच्या सर्वच आमदारांना मतदारसंघात आपापले स्थान निर्माण करण्यास तसेच मतदारसंघ व्यवस्थित बांधण्यास बराच काळ मिळाला. उलट कॉंग्रेस-मनसेचा ढिसाळपणा त्यांच्या मुळावर आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com