She was died, but not of Corona | Sarkarnama

ती चिमुरडी बळी ठरली, पण कोरोनाची नव्हे, सरकारी अनस्थेची

सुनील गर्जे
मंगळवार, 21 एप्रिल 2020

गावोगावी केलेल्या रस्ते व गावबंदीमुळे नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा मिळण्यात अडथळा ठरत आहे. या बेकायदेशीर रस्तेबंदी व प्रशासनाच्या अनास्थेमुळे नेवासे तालुक्‍यात एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा बळी गेला.

नेवासे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात येणारे रस्ते बंद केले, असले तरी आजाराची तीव्रता लक्षात घेवून रुग्णासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. तसेच मात्र होत नाही. केवळ प्रशासनाच्या अनास्थेचा फटका एका चिमुरडीला बसला. कोरोनामुळे नव्हे, तर रस्तेबंदीमुळे त्या बालिकेचा बळी गेला. नेवासे तालुक्यातील एका गावातील ही घटना ह्यदयाला पिळवून टाकणारी ठरली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या व्यक्तींना प्रतिबंध घालण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात गावोगावी केलेल्या रस्ते व गावबंदीमुळे नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा मिळण्यात अडथळा ठरत आहे. या बेकायदेशीर रस्तेबंदी व प्रशासनाच्या अनास्थेमुळे नेवासे तालुक्‍यात एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा बळी गेला. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने रस्त्यातच तिचे प्राण गेल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली.

कोरोनामुळे गावोगावी प्रवेशाचे रस्तेच अडथळे टाकून बंद केले आहेत. नागरिकांनी केलेली ही कृती कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीरच आहे. शहरी भागात काही नगर, कॉलन्या बंद असल्या, तरी तेथे नागरिकांना अनेक पर्याय आहेत. ग्रामीण भागात गावातील रस्त्यांबरोबरच दुसऱ्या गावांना जोडणारे रस्तेही अडथळे करून बंद करण्यात आले आहेत. हे ऐनवेळी अत्यावश्‍यक सेवेच्या दृष्टीने तेवढेच धोक्‍याचेही आहे. रस्त्यांवर अडथळे निर्माण केल्याने वेळीच औषधोपचार न मिळाल्याने रामडोह (ता. नेवासे) येथील रवींद्र नंदू परसय्या यांच्या आठ महिन्यांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला.

ही चिमुरडी ता. 7 एप्रिलला रात्रभर उलट्या व तापेने फणफणल्याने तिला बुधवारी सकाळी शिरसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीच उपस्थित नसल्याने येथीलच खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी पाठविले. मात्र, रात्री साडेनऊच्या दरम्यान तिला ताप, जुलाबाचा त्रास झाल्याने आजोबा नंदू परसय्या एका वाहनाने वरखेडमार्गे शिरसगावकडे निघाले. मुख्य रस्त्यावर रस्तेबंदी केल्याने त्यांनी पुन्हा सुरेगावमार्गे शिरसगाव प्रवास सुरू केला. मात्र, हाही रस्ता बंद. नंदू यांनी गावातून मदतीला काही मित्रांना बोलावून रस्त्यावरील अडथळे हटवले. चिमुरडीला घेऊन ते रात्री साडेदहा वाजता शिरसगाव येथे पोचले. मात्र, रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, अडथळ्यांमुळे रामडोह-शिरसगाव सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल सव्वातास लागला. वेळीच या चिमुरडीला औषधोपचार मिळाले असते, तर तिचे प्राण वाचले असते. किमान रुग्ण पाहिल्यानंतरतरी प्रशासनाने  रस्तेबंदी हटवावी, अशी मागणी होत आहे. 

बुधवारी रात्री आजारी नातीला उपचारासाठी घेऊन जाताना कोरोनामुळे रस्त्यांवर केलेल्या अडथळ्यांमुळे दवाखान्यात वेळेवर पोचू शकलो नाही. त्यामुळे तिने रस्त्यातच जीव सोडला.
- नंदू परसय्या, मुलीचे आजोबा, रामडोह

त्या चिमुकलीला प्राथमिक उपचारासाठी माझ्याकडे आणले होते. तिला खूपच अशक्तपणा आला होता. तसेच ताप, उलट्या, जुलाबाचा त्रास होता. तपासणी केल्यावर नेवासे येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याचे त्यांना सांगण्यात आले होते.
- डॉ. संजय तावरे, शिरसगाव 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख