She cares for wild life , we care form himan life : Hansraj Ahir | Sarkarnama

'त्यांना'  चिंता  वन्यप्राण्यांची, आम्हाला माणसांची :  हंसराज अहीर 

राजकुमार भीतकर :  सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

यावेळी त्यांनी मनेका गांधी यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचा बोलण्याचा रोख मनेका गांधी यांच्याकडे होता.

यवतमाळ  : केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे नाव न घेता, 'त्यांना वन्यप्राण्यांची चिंता आहे, आम्हाला माणसांच्या जीवाची किंमत आहे', असे म्हणत अवनी वाघिणला ठार करण्याच्या कृतीचे हंसराज अहीर  यांनी  समर्थन केले. 

अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांना वन्यप्राण्यांची चिंता होती; तर आम्हाला माणसांची होती असे मत व्यक्त करून वनमंत्र्यांची पाठराखण केली. यावेळी त्यांनी मनेका गांधी यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचा बोलण्याचा रोख मनेका गांधी यांच्याकडे होता. ते मंगळवारी (ता. 13) येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उद्धव येरमे व अमोल ढोणे आदी उपस्थित होते. 

अहीर म्हणाले की, "अवनीने नरभक्षक झाल्याने तिला ठार करावे, अशी लोकांचीच मागणी होती. वाघिणला ठार करावे, अशी सरकारची इच्छा नव्हती. परंतु, सरकारला वन्यप्राण्यांपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे होते", असे सांगून त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. 

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार नसल्याचे स्पष्ट करून अहीर म्हणाले, "भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून विधानसभेच्या निवडणुका जिंकत आहेत, आगामी सर्व निवडणुका जिंकणार आहे ," असा  विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

" शिवसेना भाजप युती ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुरू केली आहे. ती कायम राहणार असून यावेळी शिवसेना व भाजप एकत्रच निवडणूक लढेल. आजही सोबत लढू व भविष्यातही सोबतच राहू," असा विश्‍वास हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख