shashikant shinde | Sarkarnama

भाजपला प. महाराष्ट्राविषयी राग : आ. शिंदे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नियोजन समितीच्या बैठकीत आम्ही वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रस्त्यांना निधीच दिला जात नाही, हे दाखवून दिले आहे. ऊर्जा आणि पाणी या विभागावर जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. - शशिकांत शिंदे, आमदार

सातारा : विरोधकांच्या एकजुटीतून निघालेल्या संघर्षयात्रेच्या रेट्यामुळे सरकार कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर आले आहे. पण त्यातही सरसकट कर्जमाफीला बगल देत केवळ अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीचे धोरण अवलंबत आहे. प्रगतशील व बागायतदार शेतकऱ्यांना कर्जमाफीतून डावलण्याचा सरकारचा डाव आहे. पश्‍चिम महाराष्ट्राविषयी राग असलेल्या भाजप सरकारचा हा डाव आम्ही आगामी काळात उधळून लावू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

शिंदे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची भूमिका पहिल्यापासून राज्यातील भाजप सरकारने ठेवली आहे. कर्जमाफी जाहीर केल्यास केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातील 70 टक्के शेतकऱ्यांना फायदा होईल व उर्वरित महाराष्ट्रातील 30 टक्के शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हे लक्षात आल्याने देवेंद्र फडणवीसांचे सरकार विलंब करत आहे. आता आत्महत्याग्रस्त राज्यांना कर्जमाफी देण्याचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले आहेत. यामध्येही दुजाभाव निर्माण करण्याचा प्रकार आहे.

शेतकऱ्यांची दोन गटात विभागणी करून शेतीला मदतीचे धोरण सरकार राबवत आहे. यामध्ये अल्पभूधारक व कोरडवाहू आणि बागायदार, प्रगतशील शेतकरी असा निकष ठेवला आहे. सरसकट कर्जमाफी असावी अशी भूमिका असताना प्रगतशील व बागायतदार शेतकऱ्यांना डावलण्याचा सरकारचा डाव आहे. गेल्या अडीच वर्षात पश्‍चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याला डावलण्याची भूमिका सरकार घेत आहे. शहरी भागाला केंद्रित करून ग्रामीण भाग मूलभूत सुविधांबाबत शून्य काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख