sharmila yeole story | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी 'स्वाभिमानी शर्मिला'

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

शेतकऱ्यांचे प्रश्न तीने जवळून पाहिले आहेत.

नगर : अकोले येथे आज मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्य असलेल्या शर्मिला येवले या महाविद्यालयीन विद्यार्थीने शाईचा फुगा फेकला. 

अकोले तालुक्यातून वैभव पिचड यांना उमेदवारी देऊ नये, अशी तिची प्रमुख मागणी आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या ताफ्यावर शाई फेकण्याचे धाडस करणारी ही युवती कोण आहे, याबाबत आता नगर जिल्ह्यातून उत्सुकता आहे.

शर्मिला येवले ही अकोले तालुक्यातील इंदुरी येथील आहे. पुण्याच्या एका महाविद्यालयात ती सध्या एम. ए. करीत आहे. यापूर्वी १२ वी नंतर तिने अॅनिमेशनची डीग्री पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून मिळविली. 

महाविद्यालयीन काळात तिने विद्यार्थ्यांच्या संघटनेत काम केले. भाषण, संभाषणात चलाख असलेल्या शर्मिलाने मराठा क्रांती मोर्चात भाषण केले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी परिषदेची पदाधिकारी होऊन ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तिने अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. राज्य सेवा परीक्षेतील गोंधळाबाबत तिने प्रशासनाला वठणीवर आणत नियुक्त झालेल्यांची यादीही रद्द करण्यास भाग पाडले होते. 

आक्रमक भाषण करून सभा जिंकणे, हे तिचे वैशिष्ट्य. तिचे वडील सुभाषराव हे प्रगतशील शेतकरी आहे. शेतीत नवनवीन प्रयोग ते करीत असतात. शेतात वडिलांसोबत अनेकदा तिने शेतीत काम केले. शेतकऱ्यांचे प्रश्न तीने जवळून पाहिले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख