दुपारी प्रचाराला आलो म्हणून उखडलेलेच पुढे माझे आजेसासरे झाले : शरद पवार

शरद पवारांच्या जुन्या आठवणी ऐकणे म्हणजे एक मैफलच असते. ती मैफल पुण्यात आज जुळून आली. त्यांचे मित्र व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे देखील सोबत होतेच. मग या दोघांनी गप्पांचा फड रंगवला. जुने पुणे डोळ्यासमोर त्यांनी उभे केलेच पण फटकेबाजीही केली.
दुपारी प्रचाराला आलो म्हणून उखडलेलेच पुढे माझे आजेसासरे झाले : शरद पवार

पुणे : कॉंग्रेस भवन, गोखले हॉल, क्‍लब ऑफ महाराष्ट्र, प्रभात, भानुविलास चित्रपटगृहे, पवार क्वाटर्स...पुण्यातील अशा अनेक वास्तू नरहर गणपत पवार यांनी उभारल्या आहेत. सन 1893 ते 1960 या काळात या नरहर पवार यांनी एवढे काम केले. गेली अनेक वर्षे पवार मंडळी पुण्यात कामे करीत आहेत; तरीही पुणेकरांनी पवारांवर कधीही तितकी मेहेरबानी दाखवली नसल्याचा मुद्दा मांडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनोदाने अप्रत्यक्षरित्या राजकीय संदर्भ जोडला. तेव्हा, सभागृहातील उपस्थितांमध्ये विनोदी हास्याची कारंजी उडाली.

माझ्या गेल्या 52 वर्षांच्या राजकीय वाटचालीचा पाया पुणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पेपर लिफ संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची "आठवणीतील पुणे' या विषयावर मुलाखत घेण्यात आली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली. "पुणे एकेकाळी' या पुस्तकाचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते झाले.

त्याआधी पवार यांनी पुण्यातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेषत: "बीएमसीसी'तील शिक्षण, फर्ग्युसन आणि एसपी कॉलेजमधील वावर, त्यामागची कारणेही पवारांनी दिलखुलासपणे सांगितली. तेव्हा सभागृहात जोरदार हशा पिकला. श्रीनिवास पाटील हे आता माजी राज्यपाल आहेत, मात्र, त्यांचे महाविद्यालयीन जीवन कसे होते ? याचा उलगडा करीत पवारांनी आपल्या भाषणादरम्यान श्रीनिवास पाटलांनाही बोलके केले. या दोघांनी आपल्या आवडीचे वक्ते, गायक, नाटककारांपासून हिराबाई बडोदकर, गजानन वाटवे यांची गाणी आणि नाटक-चित्रपट पाहण्यासाठी गेल्यानंतरच्या कॅम्प परिसरातील आठवणीही सांगितल्या. 

पुण्यातील एका निवडणूक प्रचारा दम्यानच्या एका घटनेचा आर्वजून उल्लेख करून पवार म्हणाले, ""कॉंग्रेसचे उमेदवार स.गो.बर्वे यांचा प्रचार करीत होतो. तेव्हा, प्रभात रस्त्यावरील एका घरी गेलो. दोन ते तीन वेळा बेल वाजविल्यानंतर दरवाजा उघडला. तेव्हा, दुपारचे दोन वाजले होते. पुढच्या व्यक्तीने प्रश्न विचारला, ""ही वेळ आहे का ? कशासाठी आलात ? त्यावेळी मी म्हणालो, ""कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी. त्यावर हे घर कॉंग्रेसचे नाही असे सांगत, आम्हाला जायला सांगितले. मात्र, ही व्यक्तीच माझे आजेसासरे झाले.''

 
एकदा विधीमंडळासाठी पाहण्यसाठी गेलो, तेव्हा गॅलरीत बसून आचार्य अत्रेंचे भाषण ऐकत होतो. तिथे पायावर पाय ठेवून बसण्याला बंदी होती. मात्र ती चूक मी दोनदा केल्याने तेथून मला बाहेर काढण्यात आले. त्यावर संबंधित सुरक्षारक्षकावर रागावून मी म्हणालो, ""मी परत येईल, तेव्हा सभागृहाचा सदस्य म्हणूनच येईल.' 

पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे. असे पवार यांनी या वेळी सांगितले. आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का, या प्रश्नावर त्यांनी आता निवडणूक नाही असे पवारांनी सांगितले.


तुम्हाला पुण्यात कोणते पदार्थ खाण्यास आवडत त्यावर श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘एस.पी समोर जीवनामध्ये चहा बटाटेवडा, भेळ आणि पदार्थ. तेवढ्यात शरद पवार म्हणाले, ‘पाटील, कासमचा खिमा विसरलात का?’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. “आम्ही गावाकडून शहरात शिकण्यास आलो. पुण्यात अनेक ठिकाणी फिरलो. त्यावेळी काही हॉटेल मध्ये जेवणासाठी नेहमी जायचो. घरून महिन्याच्या खर्चासाठी पैसे दिले जायचे. त्यामध्ये शरद राव, मी आणि धनाजी आमच्या तिघा मित्राचा खर्च लिहिला असायचा तो खर्च घरी देत असत. आज ही त्यावेळीची वही जपून ठेवली आहे, अशा आठवणी श्रीनिवास पाटील यानी सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com