Sharad Pawar's advice to Rohit Pwar | Sarkarnama

रोहित पवारांना शरद पवार काय सांगतात ?  

संदीप काळे 
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काही युवा नेत्यांच्या चेहऱ्यांची नाव सध्या खूप चर्चेत आहे. त्यातील एक नाव म्हणजे रोहित पवार..! जामखेड कर्जत या मतदार संघात वेगवेगळ्या विषय हाताळून त्यांनी यश मिळवून दिले आहे. सकाळ माध्यम समूहाच्या 'यिनबझ'च्या महाराष्ट्र दौऱ्यात कर्जत जामखेड मतदार संघातील रोहित पवार यांच्याशी संदीप काळे  संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.  प्रश्न - उत्तर स्वरूपातील रोहित पवारांची मुलाखत  . 

 

शरद  पवार यांच्याशी तुमची चर्चा होते तेंव्हा ते काय मार्गदर्शन करतात ? 

-पवार साहेब माझ्यावर प्रेम करतात, ते फक्त मी त्यांचा नातू आहे म्हणून नाही.  तर स्वच्छ मनाने , सर्वसामान्यांचे हित  केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या अनेक तरुणांना ते मदत मार्गदर्शन करतात .  अनेकदा फोनवर आमच्या गप्पा होतात, त्यावेळी कुठल्या अडचणी येतात का? अडचण आली तरी काय करावं? त्यातून कसा मार्ग काढावा? याबाबत चर्चा होत असते. हे सर्व करत असतांना प्रत्येक काम हे विकास आणि आणि सकारात्मक दृष्टीने करावे असे ते सांगत असतात. 

त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच असते. ते सांगतात की आयुष्यात चढ उतार असतातच . प्रतिकूल परिस्थितीत हतबल होऊन चालत नाही . कष्ट करावे लागतात. मनात विश्वास ठेवावा लागतो. कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा लागतो. कुठल्याही अडचणींवर मात करण्याची जिद्द बाळगावी लागते . सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्यात मिसळावे .  सुखदुःखाला धावून जावे . आपल्याकडे जी काही ताकद असेल त्यानुसार त्यांना मदत करावी . राजकारण करताना जातीपातीचे राजकारण करू नये तर विकासाचे राजकारण करावे . 

 

 

मतदार संघात फिरताना नेमक्या काय अडचणी पुढे येतात?  

-एकंदरीत मतदार संघात फिरताना अजूनही विकास म्हणजे नेमकं काय? हे लोकांच्या लक्षात आलेले नाही. वीज, पाणी, रस्ते या सर्व गोष्टी मूलभूत गोष्टी आहेतच, मात्र त्यासोबतच शिक्षण क्षेत्रात काम, तरुणांसाठी रोजगार मेळावे, करिअर प्लॅन यासर्व गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. यासोबतच खेळ, कलाक्षेत्र आणि सांस्कृतिक मुद्द्यांकडे लक्ष देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. अध्यात्माला देखील याठिकाणी एक वेगळं व्यासपीठ द्यावं लागेल. या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी एकत्रित आणू, त्यावेळी नेमका विकास झाला, असं आपण म्हणू शकू.

ठिकठिकाणी आरोग्यासाठी तुम्ही वेगळे उपक्रम राबवत आहात, ते नेमके कोणते?

-आम्ही बारामती, पुरंदर यांसारख्या विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेतले आहेत. याठिकाणी देखील आरोग्य शिबीर घेत आहोत. यामध्ये डोळ्यांच्या समस्या असणारी लोकं, अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करणारे, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्वाचे विषय याठिकाणी हातळले जातात. लोकांना   या आजारांबाबत नेमकं उपचार कसे घ्यायचे हे माहित नसते, त्यांना योग्य दिशा दाखवून हॉस्पिटल, डॉक्टर यांच्या मदतीने त्यांना उपचार देण्याचे काम आम्ही करतो.

विकासाबाबत पहिले प्राधान्य कोणाला द्याल?
 

-कर्जत जामखेडच्या विकास आम्हला करायचा आहे, त्यानुसार लोकांनी आम्हाला जे प्रेम दाखवले त्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे पाहिलं प्राधान्य हा मतदारसंघ आणि या मतदार संघातील मतदारांचा विकास हाच असेल. पण हेच सर्व करत असताना अनेक कामामुळे राज्यभर फिरणं होतं, त्यामुळे तेथील लोकांना काही मदत लागणार असेल तर त्याचाही नक्की प्रयत्न करू.

मॅनेजमेंट गुरु म्हणून तुमची ओळख आहे, काय सांगाल?

-काम करत असताना तुमचे कष्ट, कुठलीही अडचण आल्यावर त्यावर मात करण्याची क्षमता खूप महत्त्वाची ठरते. लोकांना मदत करत असताना केवळ विकासाचं राजकारण करावं असं मला वाटत. कोणत्याही कंपनीत काम करत असताना ज्याप्रमाणे मॅनेजमेंट महत्त्वाचं ठरतं त्याप्रमाणे लोकांना, तरुणांना सकारात्मक दिशेने नेणे  महत्त्वाचे आहे.

रोहित पवारांच्या मेहनतीमागचं प्लॅनिंग काय?

-आपली इच्छाशक्ती असेल, लोकांवर प्रेम असेल, आणि लोकांच्या  समस्या सोडविण्याची धडपड असेल तर अनेक गोष्टी शक्य होतात. आम्ही या परिसरामध्ये ज्या गोष्टी करतोय तो त्या अनुभवातून करत आहोत. त्यामुळे एखादी गोष्ट शेवट्पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास असल्यामुळे हे शक्य होते. यातून आपण पाहिलं तर हा इव्हेन्ट नसून कार्यक्रम आहे, यातून लोकांचाच फायदा होतो. यामध्ये चर्चा, लोकांशी भेटी-गाठी यांचा समावेश असतो. कधीतरी दिवसभर गावागावांत जाऊन लोकांशी चर्चा करत असतो.

तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न कसे हाताळता?
 

-अनेकवेळी रोजगाराचा विषय घेऊन तरुण मंडळी येत असतात. त्यावेळी त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांचं काम होणार असेल तर मी संबंधित कंपनीशी बोलून त्यांचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो.

शरद पवारानंतर दुसरा चेहरा म्हणजे रोहित पवार अशी चर्चा आहे, काय सांगाल?
 

- कोण कोणानंतर असणार हे आपण व्यक्ती म्हणून नाही ठरवू शकत, ते त्या त्या विभागातील लोक ठरवत असतात. त्यामुळे जर लोकांचं असं मत असेल की, साहेबांसारखा हा काम करतो, साहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहे, तर माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. साहेबांनी आजपर्यंत ज्या गोष्ट केल्या, मग ते सामान्यांसाठी काम असोत किंवा मेहनत. त्या सर्व गोष्टी मी पुढे नेणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख