sharad pawar wrote home minister for arrangement of chairs for police at rallies | Sarkarnama

पोलिसांना फूल पॅंट देणाऱ्या शरद पवारांचा आता खुर्चीसाठीही पुढाकार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राज्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.

याबाबत पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्यांप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

"जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलिस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात. सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही."असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

" सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात.व पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार हे राज्यात प्रथम 1978 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. त्या वेळी पोलिसांना हाफ पॅंट होत्या. ती फूल पॅंट करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला होता. त्याचीही आठवण अनेकांना या निमित्ताने झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख