पवार विरुद्ध फडणवीस लढाईत विजय पवारांचाच !

'नव्या पिढीला पवारांचं राजकारण मान्य नाही' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या जनतेने चोख उत्तर दिलंय.
SHARAD_PAWAR_DEVENDRA_FADANAVIS
SHARAD_PAWAR_DEVENDRA_FADANAVIS

'नव्या पिढीला पवारांचं राजकारण मान्य नाही' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या जनतेने चोख उत्तर दिलंय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाढलेल्या जागा हेच सांगताहेत.

भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक मुद्द्यांना फाट्यावर मारून कलम ३७०, काश्मीर, राष्ट्रवाद, पवार घराणं, कथित भ्रष्टाचार वगैरे विषयांवर भर देण्यात आला. पवार कुटुंबियांवर वैयक्तिक आरोप करत प्रचाराने गलिच्छ पातळी गाठली.  

शहरीकरण वाढतंय. इथे रोजच्या जगण्याचा प्रश्न गंभीर होतोय, बेरोजगारीची समस्या भीषण होत जातेय, पुण्यासारख्या शहरात एका रात्री पावसाने होत्याचं नव्हतं झालं; पण यातलं काहीही भाजपच्या प्रचारात उमटलेलं दिसलं नाही. याउलट शरद पवारांनी प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु केला. नाशिकमध्ये कांदा तर मराठवाड्यात नोकरी अशा विषयांवर ते बोलले. विरोधकांनी केलेला प्रत्येक वार त्यांनी पलटवून लावला. वय, आजार यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते थेट भिडले - विरोधकांनाही आणि लोकांच्या मनालाही.

एकीकडे पवार जनमताची मोट बांधत असतांना पक्षाकडून संधी देण्यात आलेल्या चेहऱ्यांनी अपार मेहनत घेतली. धनंजय मुंडे, रोहित पवार यांसारख्या नेत्यांनी डोक्यात हवा न जाऊ देता दारोदार जाऊन प्रचार केला. मतदारसंघ पिंजून काढला. 
जनसंपर्क, स्थानिक विषयांची जाण, माध्यम समन्व्य आणि नव माध्यमांचा सुयोग्य वापर, त्याचबरोबर पारंपरिक सभांची जोड देत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि मतदारांचा विश्वास मिळविण्यात ते यशस्वी देखील झाले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गलिच्छ आरोप करत पंकजा मुंडे यांनी निवडणुकीला भावनिक वळण देण्याचा केलेला प्रयत्न सपशेल फसला. तर दुसरीकडे बाहेरचा म्हणून हिणवले गेलेल्या रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या मतदारांनी दिलखुलासपणे स्वीकारल्याचे दाखवून दिले.

राष्ट्रवादीला लोकांनी नाकारलं आहे असं म्हणत त्यांच्याच पक्षातले लोक भाजपने आयात केले. पक्षातील निष्ठावंतांना डावलून या आयारामांना तिकीट दिली. संघटनात्मक बांधणी, वैचारिक निष्टेचा पाया अशी मूलभूत तत्वे या निवडणुकीत भाजपने धाब्यावर बसवली. स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेचा मायाजालात भाजप हरवलेला दिसून येतोय.

२०१४ आणि त्यानंतर मोदी लाटेने अनेकांना तारले. तिकडे नरेंद्र इकडे देवेंद्र असा प्रचारही या निवडणुकीत भाजपने सुरु केला. सोशल मीडियापासून सगळीकडे पवार विरुद्ध फडणवीस अशीच प्रतिमा उभी करण्यात अली. लोकसभेतही विरोधक म्हणून पवार आणि विधानसभेलाही पवारच! भाजपने राज्यात नेतृत्व दिले खरे पण विरोधक म्हणून पवारांना हाताळताना भाजप तोंडावर पडले. निवडणूका जितक्या स्थानिक होत जातील तितकं मोदी करिष्मा कमी होताना दिसतो. भाजपला राज्यात देवेंद्र हे सर्वमान्य नेतृत्व म्हणून मिळाले असल्याचा भ्रम या निवडणुकीत दूर झालाय.

निवडणुकीपूर्वी पवारांच्या राजकारणावर बेलगाम टीका करणाऱ्या फडणवीसांनी स्वतःच्या पक्षात अनेकांचं राजकारण पद्धतशीररित्या संपवलं. या सगळ्यात पक्षाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक झालं. निवडणुकीला नेतृत्व म्हणून चेहरा झालेल्या फडणवीसांनी या घटलेल्या मताधिक्याचीही जबाबदारी घ्यावी आणि मुख्यमंत्री पदापासून माघार घ्यावी, अशी मागणी उद्या आली, तर ती गैर ठरणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com