वाकडं पाऊल टाकलं; तर पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा

वाकडं पाऊल टाकलं; तर पाय काढू : शरद पवारांचा इंदापुरात इशारा

वालचंदनगर : "मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहे. ठिकठिकाणचे राजकारण बदलले आहे. नव्या पिढीला, तरुणाला बदल हवा आहे. जनतेने विश्‍वासाने राज्य ताब्यात दिले. मात्र, त्यांनी सत्तेचा पाच वर्षांत गैरवापर केला. मोदी, शहा, फडणवीस हे भाषणामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ माझे नाव घेत आहेत. झोपेतसुद्धा चावळत असतील,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.


इंदापूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पवार बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जगन्नाथ मोरे, उत्तम फडतरे, राजेंद्र तांबिले आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा धरलेला रस्ता चुकीचा असून, त्यांना जनता जागा दाखवेल. पक्ष सोडणाऱ्याला जनता थारा देणार नाही. पक्ष सोडतो, त्याला मी थारा देत नाही. भरणेमामांनी पाच वर्षांमध्ये 1300 कोटी रुपये, प्रवीण माने यांनी झेडपीच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचा निधी आणला. 19 वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी काय केले? भरणेमामांचे काम करणाऱ्या नागरिकांना दमदाटी केली जात आहे. त्यांना जागा दाखवली जाईल. माझी विनंती की, दमदाटीचे राजकारण करू नये. वाकडं पाऊल टाकलं; तर पाय काढू.''

सरकारमुळे बेरोजगारी वाढतेय
"देशातील 70 टक्के नागरिक शेतीव्यवसाय करीत आहेत. शेतकरी शेती पिकविण्यासाठी, विहिरीसाठी शेतकरी कर्ज काढत असतो. दुष्काळामुळे पिके वाया जातात. मात्र, पीक कर्ज डोक्‍यावर राहते. बॅंकेच्या जप्तीची नोटीस आल्याने 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशातील 300 उद्योजकांचे 81 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले. त्यांचे कर्ज सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे घेऊन भरले. राज्यकर्ते सत्तेचा उपयोग शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी करीत नाहीत. सरकारमुळे एका दिवसामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. पाच वर्षांमध्ये राज्यामध्ये नवीन कारखाने, उद्योगधंदे आले नाहीत. मात्र, आहे त्यातील पन्नास टक्के कारखाने बंद पडले. त्यामुळे कामगारांच्या नोकरीचा प्रश्‍न निर्माण झाला असून, बेरोजगारी वाढली आहे,'' असा आरोप शरद पवार यांनी केला.

"शंकररावांना काय वाटले असेल?'
""हर्षवर्धन पाटील हे, "जागावाटपामध्ये आमच्यावर अन्याय झाला,' असे सांगत आहेत. मी त्यांना सांगितले होते, आपण मार्ग काढू. इंदापूरच्या जागेविषयी भरणेमामांशी चर्चा झाली. मामांनी, "तालुक्‍यामध्ये मतभेद होत असतील; तर थांबण्यास तयार आहे,' असे सांगितले. यानंतर मी स्वत: हर्षवर्धन पाटील यांना आठ वेळा फोन केला. त्यांना निरोपही दिला. मात्र, नंतर कळाले, की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यांनी जन्मभर कॉंग्रेस पक्षाचे काम केले, त्या स्वर्गीय शंकररावांनीही कॉंग्रेसचा विचार सोडला नाही. त्यांना काय वाटले असेल,'' असा सवाल शरद पवार यांनी केला.

माझा पण बाप आहे : सुळे
या वेळी नागरिक, "आला रे आला, मोदी-शहांचा बाप आला,' अशा घोषणा देत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी, "पवारसाहेब माझे पण बाप आहेत,' असे म्हणताच सभेमध्ये हशा पिकाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com