Sharad Pawar Taunts Opponents | Sarkarnama

अनेकांना मी निवृत्त व्हावे वाटत होते : शरद पवारांचा विरोधकांना टोला

कल्याण पाचांगणे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अनेकांना मी निवृत्त व्हावे असे वाटत होते. पण जनतेने आणि विशेषत: युवकांनी ते घडू दिले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज आपल्या विरोधकांना लगावला.

माळेगाव : अनेकांना मी निवृत्त व्हावे असे वाटत होते. पण जनतेने आणि विशेषत: युवकांनी ते घडू दिले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज आपल्या विरोधकांना लगावला.

अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या 'कृषिक-2020' प्रत्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रसिद्ध अभिनेते आमिर खान कृषीमंत्री दादासाहेब भुसे, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आंतराष्ट्रीय धोरणकर्ते (इज्राईलचे सल्लागार दूत) डॅन अलुफ, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार,आमदार रोहित पवार, धिरज देशमुख, बबनराव शिदे यांच्यासह व राज्यातील बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू,शास्त्रज्ञ उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुप्रिया सुऴे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शरद पवार यांना भाषणापुर्वी पुष्पगुष्छ देऊन सत्कार करण्यात आला. हाच धागा पकडत शरद पवार यांनी भाषणाच्या सुरवातीलाच पुष्पगुच्छ देवून मला निवृत्त व्हावे, असा तुमचा विचार आहे का? अनेकांनाही असेच वाटत होते. मात्र जनतेने विशेषतः युवकांनी ते काही घडू दिले नाही, असा टोला पवारांनी लगावताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडक़डाट करीत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

''मी अनेक शेतीशी निगडीत प्रदर्शने पाहिली, मात्र प्रात्यक्षिकासह शेती काय असते, याचे तत्वज्ञान सांगणारे भारतातील एकमेव प्रदर्शन म्हणजे कृषिक 2020 आहे. हवी हवीशी वाटणारी शेती जर हवेतच झाली तर किती आनंद होईल, असा आनंद बारामतीच्या कृषी प्रदर्शनात प्रत्येक्ष हवेतील शेती पाहुन अनुभवयास मिळाला. राजकारणात मतभेद असतात पण एकाद्याचे काम चांगले असले, तर त्याचे कौतुक झाले पाहिजे. जर या कामाचे कौतुक झाले नाही, तर तो करंटेपणा ठरेल." पवार कुटुंबियांनी बारामतीच्या माळरानावर हे नंदनवन उभे केले हे सोपे नाही, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.

तत्पूर्वी बोलताना शरद पवार म्हणाले, "शेतीमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याचे काम बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र करीत आहे. यामध्ये त्यांचा सर्व सेवक वर्ग व त्यांचे नेतृत्व करणारे राजेंद्र पवार यांचे कार्य महत्वाचे आहे. जगाची शेती बदलत चालली आहे. उत्पादकता वाढली आहे. भारतातही लोकसंख्या खूप वाढत आहे. यामध्ये शेती हे महत्वाचे क्षेत्र असून देशातील शेतीतही बदल केला पाहिजे. नवनविन संशोधन केले पाहिजे. केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत, हे सर्व काम बारामतीचे कृषी केंद्र करीत आहे, याचा आनंद वाटतो.'' 

त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाच धागा पकडत शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे सरकारचे काम आहे. ते आम्ही राज्यकर्ते म्हणून एका दिलाने करत राहणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या योजना देशासाठी मार्गदर्शन ठरतील अशा पद्धतीने राबवू, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आंतराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्त्राईल सल्लागार दूत) डॅन अलुफ यांचेही मनोगत झाले. यावेळी प्रस्ताविकामध्ये राजेंद्र पवार यांनी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषिविज्ञान केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख