शिवसेना आणि भाजपमधील अस्वस्थता जाणवत होती - शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी `निवडणूक झाल्यानंतर आणि मतमोजणीच्या सुरवातीला शिवसेनेत आणि भाजपमध्ये अस्वस्थतता जाणवत होती' असे आज एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितले.
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी `निवडणूक झाल्यानंतर आणि मतमोजणीच्या सुरवातीला शिवसेनेत आणि भाजपमध्ये अस्वस्थतता जाणवत होती' असे आज एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितले.
मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपबाबत जाणवलेल्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, की निकालानंतर काही गोष्टी घडत आल्या. त्यामुळे जे घडतंय त्याच्यावर लक्ष ठेवून योग्य वेळी त्याच्यामध्ये आपण उतरणे, सहभागी होणे आणि त्याला आवश्यक अशा प्रकारची जी दिशा आपल्यादृष्टीने देण्याची गरज आहे, ती देण्याचा प्रयत्न करण्यावर माझे लक्ष होते. या निवडणुकीमध्ये निकाल आमच्या आमच्या बाजूने नाही. विरोधी पक्षात बसण्याचा आदेश दिला आहे. तो पार पाडू, अशी जाहीर भूमिका मी घेतली. आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत, हे मी स्पष्ट केले. आम्ही सत्तेच्या अपेक्षेने पावले टाकत नाही. राष्ट्रवादीला सत्ता हवीय अशी स्थिती नाही, ही वस्तुस्थिती आणि संदेश त्यातून द्यायचा होता.
आम्ही आणि कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढलो. आमच्या दोघांची संख्या शंभर ते 106 च्या आसपास होती. त्यामुळे तसं म्हटलं तर सत्तेत येऊ शकत नव्हतो. हा संदेश मला विशेषतः शिवसेनेला द्यायचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक झाल्यानंतर आणि मतमोजणीच्या सुरवातीला शिवसेनेत आणि भाजपमध्ये अस्वस्थतता जाणवत होती, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की भाजपने ज्यांना संधी दिली नाही, त्यांच्यातील अस्वस्थता लक्षात येत होती. त्यांच्यात प्रस्थापित राज्याच्या नेतृत्वाबाबत नाराजी जाणवत होती. दुसरीकडे शिवसेनेतील अनेकांना आपण नेहमीच दुय्यम भूमिका कशी घ्यायची, असे वाटत होते. विशेषतः बाळासाहेब ठाकरेंनी सहकाऱ्यांना तुम्ही महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने पावले टाकत पाहिजेत, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले होते. बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांनी बाळासाहेबांचा आदेश कृतीत आणण्यासाठी पडेल ते कष्ट घेण्याची भूमिक घेणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गामध्ये महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसलेला शिवसैनिक पाहायचाय, हे सांगितले होते, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असा विचार या लोकांच्यामध्ये होता.
या वेळी लागलेल्या निकालात कुठले तरी दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार बनत नव्हते. साहजिकच भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यात अडचण नव्हती. पण नेतृत्वाच्या इच्छेची पूर्तता करायची असेल, तर त्याच्यातून सामंजस्याने मार्ग काढायला पाहिजे, असा एक विचार शिवसेनेच्या काही लोकांच्यामध्ये होता, हे मला जाणवत होते, असेही पवार यांनी सांगितले.

