Sharad Pawar Suggest Measures to Strengthern Economy | Sarkarnama

सर्व घटकांना सावरण्यासाठी तातडीने पावले उचला : शरद पवार

उमेश बांबरे
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनामुळे देश व राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घ कालीन परिणाम  होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जफेड करता येणार नाही त्यामुळे त्यांना आगामी चार ते पाच वर्ष्याचे हप्ते बांधून द्यावेत. बँकांनी वसुली थांबून व्याजात सवलत द्यावी. असंघटित कामगारांचा प्रपंच सावरण्यासाठी तातडीने मदत करायला हवी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केली

सातारा : कोरोनामुळे देश व राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घ कालीन परिणाम  होणार आहे.  शेतकऱ्यांना कर्जफेड करता येणार नाही त्यामुळे त्यांना आगामी चार ते पाच वर्ष्याचे हप्ते बांधून द्यावेत. बँकांनी वसुली थांबून व्याजात सवलत द्यावी. असंघटित कामगारांचा प्रपंच सावरण्यासाठी तातडीने मदत करायला हवी. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या घटकांना सावरण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आज 'फेसबुक लाईव्ह' च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला केली आहे.

श्री. पवार म्हणाले, ''कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. याचा शेती, उद्योग आणि व्यवसायावर दूरगामी परिणाम पहायला मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी चार ते पाच वर्ष त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढ दिली पाहिजे. तसेच त्यांना कर्ज व्याजात ही सूट द्यावी.  विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आता या परिस्थितीत कापसाची खरेदी थांबली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला तातडीने मदतीची गरज आहे. शासनाने अन्नधान्य मोफत देण्याचे घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पण याची दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे याचा परिणाम शेती आणि अर्थव्यवस्थेवर होईल.''

ते पुढे म्हणाले, "असुरक्षित कामगारांचा प्रश्न आहे.  त्यांचे व्यवसाय सध्या बंद आहेत. या सर्व घटकांना वेळीच मदत होण्यासाठी राज्य शासनाने वेगळा विचार करायला हवा. सध्याच्या संकटात वैद्यकीय व्यवस्था पाहणारे डॉक्टर, पॅरामेडिकल फोर्स, कर्मचारी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी अहोरात्र काम करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून ते कार्यरत आहेत.या सर्वांना शासनाने प्रोत्साहन देऊन त्यांना इन्सेंटिव्ह देण्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच त्यांच्या कार्याची नोंद घेतली पाहिजे.  सध्याच्या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी पैसा उपलब्ध केला पाहिजे. सवलती दिल्या पाहिजेत. त्या तातडीने दिल्या गेल्या तरच सर्व काही सुरळीत चालेल.''

'''पहिले दीड वर्ष याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर जाणवणार आहे, शेतकऱ्यांना शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व इतर व्यवसाय प्रत्येकाबाबत तातडीने पावले उचलली पाहिजेत व सर्वांना सहकार्य केले पाहिजे.आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने सर्व आमदार व खासदार यांचे  एक महिन्याचे वेतन एकत्रित जमा करून शासनाला देणार आहोत. याबाबतचे लेखी पत्रही आम्ही लवकरच पाठवत आहोत. पण केंद्र शासनाने राज्य शासनाने आता निर्णय घेऊन सर्व घटकांना मदत कशी करता येईल या दृष्टीने  पावले उचलली पाहिजेत,'' असेही पवार यांनी सांगितले. 

प्रमुख मुद्दे - 

- शेतकऱ्यांची वसुली थांबवून व्याज सवलत द्या

- असंघटित कामगारांचा संसार सावरण्यासाठी उपाय करा

- पहिले दीड वर्ष अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवेल

- कोरोनाच्या काळात लढणाऱ्या डाॅक्टर, पॅरामेडिकल फोर्स, पोलिस यांना इन्सेंटिव्ह द्या

- दुग्ध व्यवसायाबाबतही पावले उचलली जाणे आवश्यक

- शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी चार ते पाच वर्षांची मुदतवाढ द्यावी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख