sharad pawar says work like shivsean shakha pramukh | Sarkarnama

पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या : शिवसेना शाखाप्रमुखासारखे काम करा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

...

जळगाव : शिवसेनेचा शाखाप्रमुख नागरिकांचे प्रश्‍न सोडवितो. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार विजयी होतात. नागरिकांना मदत करा, त्यांचे प्रश्न सोडवा. विजय तुमचाच आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

जळगावमध्ये राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, सर्वश्री दिलीप वाघ, अरुण पाटील, गफ्फार मलिक, करीम सालार, कल्पना पाटील, अभिषेक पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की येथे राष्ट्रवादीचे एवढे मोठे कार्यालय आहे. किती सर्वसामान्यांचे प्रश्‍न तुम्ही दररोज सोडविता? किती पदाधिकारी रोज कार्यालयात बसून प्रश्‍न समजावून घेतात, नागरिकांना न्याय मिळवून देतात ? यावर सर्वच निरुत्तर झाले. मात्र काही वेळ बसतो, असे उत्तर मिळाले. त्यावर श्री.पवार म्हणाले, की किती जणांना न्याय मिळाला ते सांगा. त्यावर कार्यकर्त्यांनी कोणालाच नाही असे उत्तर दिले.

श्री.पवार म्हणाले, शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे माझे मित्र होते. त्यांनी शिवसेना मुंबईत सुरू केली. प्रत्येक जिल्ह्यात, गावात शाखाप्रमुख नेमला. हा शाखाप्रमुख रोज सायंकाळी सहानंतर तीन तास बसून गावातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवीत असे. त्यांना मदत करीत असे. तेव्हा मतदार शिवसेनेला निवडणुकीत विजयी करायचे. आपणही रोज राष्ट्रवादीच्या कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवा. पुढील महिन्यात दिवसभर कार्यकर्ता कार्यशाळा घेऊन त्यात कार्यकर्ता, पदाधिकारी कसा असावा, त्याच्या जबाबदारी कर्तव्य यावर मार्गदर्शन करेन.

श्री.पवार म्हणाले, जो कार्यकर्ता पक्षाचे काम करतो, संघटन वाढवितो, नागरिकांचे काम करतो त्यांची पदाधिकाऱ्यांनी शिफारस करावी. जो फक्त स्वतःचे तेवढे पाहतो त्याची तुम्ही शिफारस करू नका.

जळगाव शहरात संघटन नाही
माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी म्हणाले,की जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवाचे विविध कारण आहे. प्रत्येक तालुक्‍यात संघटन वाढवावे लागेल. जळगाव शहरात संघटन नाही. ते होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आमदार अनिल पाटील म्हणाले, की मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात मी कार्यकर्त्यांचे जी कामे आणतो ती होण्यासाठी मदत करावी.

दिलीप वळसे पाटील म्हणाले,की गावपातळीपासून तालुका, जिल्हापातळीवर भक्कम संघटन हवे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात झालेल्या पराभवासाठी पक्षाला भूमिका ठरवावी लागेल. एकदा पक्षाने उमेदवार नेमला की त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. आपली वैयक्तिक मते बाजूला ठेवावीत.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्या
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले, की भाजपची सत्ता आता नाही. तरी त्यांच्या मर्जीतील तहसीलदार, पोलिस निरीक्षक, तलाठी ऐकतात. राष्ट्रवादीने तहसीलदार, पोलिस निरीक्षक, तलाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकतील अशी ताकद द्यावी. तेव्हाच पदाधिकाऱ्याचे वजन वाढेल. भाजप आमदारांनी सत्ता असताना हवा करून घेतली. आता म्हणतात आम्ही सर्व निधी आणू. पवार साहेबांनी आमदारांना केवळ आमदार निधी द्यावा, इतर निधी देवू नये.
पराभव चिंतन समिती नेमा...
पाचोऱ्याचे नितीन तावडे म्हणाले, साहेब जिल्ह्यात राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार निवडून आला. तरीही राज्यात तुम्ही सत्ता आणली. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीचा उमेदवारांचा पराभव का झाला बाबत पदाधिकाऱ्यांनी चिंतन सभा घेतली नाही. तालुका, जिल्हावार चिंतन सभा घेऊन पराभवाची कारणे शोधावी व विजयासाठी प्रयत्न व्हावेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख