sharad pawar questions party workers in nagar | Sarkarnama

नगरमध्ये भाजपचे पाच आमदार कसे काय निवडून येतात? : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पंतप्रधान मन की बात करतात, पण जन की बात समजूनच घेतली जात नाही. ती समजून घ्यायला शिका. देशातील उद्योगाचे 80 हजार कोटी कर्ज सरकार भरतेय. शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

-शरद पवार 

नगर : नगर जिल्हा पुरोगामी आणि कम्युनिस्टांचा जिल्हा आहे. येथील लोक वैचारिक आहेत. असे असताना भाजपचे पाच आमदार निवडून येतात, हा विचारांचा पराभव आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्याचे चित्र बदलायचे आहे. त्यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आज शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अध्यक्ष मंजूषा गुंड, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रताप ढाकणे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "बीडमध्ये एकेकाळी एकहाती सत्ता होती. खासदार आणि सर्व आमदार पक्षाचे होते. आता फक्त एक आमदार आहे. आता परिस्थिती बदलली आहे. आजच्या बीडच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. लोक काम करायला तयार आहे. नेत्यांनी एक झाले पाहिजे. राज्यात मराठवाडा, सातारा, नगर, सांगली, सोलापूर भागात दुष्काळ आहे. आता पाऊस आला नाही, तर चित्र विदारक होणार आहे. राज्यात दुष्काळाचे सावट असताना सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. आपल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी आली आहे. अजून निवडणुकांसाठी पाच महिने बाकी आहेत. दुष्काळात लोकांसाठी काम करा.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख