sharad pawar on president rule | Sarkarnama

लागलीच निवडणुका होणार नाहीत, फार तर राष्ट्रपती राजवट लागू शकेल : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी सरकार बनवायला हवे.

मुंबई : राज्यामध्ये लागलीच निवडणुका होण्याची शक्यता नाही फार तर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले 

शरद पवार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी सरकार बनवायला हवे. या दोघांपैकी कोणीतरी एकाने समंजसपणा दाखवण्याची गरज आहे. या दोघांचं ठरलेलं होतं तसं त्यांनी करावं परंतु सरकार स्थापन करायला हवं. 

राज्यपाल स्वतः सरकार स्थापनेला जाणून-बुजून विलंब करीत आहेत काय ? असे विचारले असता श्री शरद पवार म्हणाले, राज्यपालांवर मी भाष्य करणार नाही. राज्यपालांचा तो अधिकार आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही मात्र अनेकदा राज्यपाल  सिंगल लार्जेस्ट पार्टीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देत असतात . 

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार का घेत नाही ? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, आम्ही फक्त सल्ला देऊ. तुम्हाला (महायुतीला) जनतेने मॅण्डेट  दिलेले आहे. तुम्ही सरकार स्थापन करायचे आहे. 

सत्तास्थापनेसाठी आमदार फोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत काय, अशी विचारणा केली असता पवार म्हणाले, माझ्याकडे याबाबत ऑथेंटिक माहिती नाही. मात्र या संदर्भातल्या बातम्या वाचलेल्या आहेत. 

शिवसेनेने आपल्याला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्याबाबत सुचवायचे आहे काय असे विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे शिवसेनेने कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही आणि भाजपने सुद्धा दिलेला नाही. रामदास आठवले मला भेटण्यासाठी आले होते मात्र त्यांनी या भेटीमध्ये राज्यात सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आणि लवकर सर्व परिस्थिती सुरळीत व्हावी अशी आशा व्यक्त केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख