sharad pawar praises r r patil. criticise fadavnis | Sarkarnama

आर. आर. मोटारसायकलीवरून गडचिरोलीत फिरत, फडणवीस तिथे कितीवेळा गेले?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 मे 2019

मी मुख्यमंत्री असताना त्या भागात जात होतो. लोकांना दिलासा देत होतो. त्या भागाच्या विकासासाठी आम्ही विशेष निधीची तरतूद केली होती. - शरद पवार

पुणे : "आर. आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना ते महिन्याला नक्षल भागात जात होते. मोटारसायकलीवरून त्या भागात फिरत होते. त्यांची अधिकाऱ्यांना काळजी वाटायची. पण आर. आर. यांनी स्वतःची काळजी केली नव्हती. त्यांनी स्वतः मागून पालकमंत्रीपद घेतले आणि त्या पदाला न्याय दिला. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. आजचे गृहमंत्री किती वेळा गडचिरोलीला गेले?" असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. 

"आर. आर. पाटील यांनी तिथल्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला होता. लोकांना आधार वाटावा म्हणून ते महिन्याला गडचिरोलीला जायचे पण सध्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हल्ला झाल्यावर केवळ श्रद्धांजली देण्यास जातात. लोकांना त्यांचा आधार वाटत नाही. फडणवीस नागपूरचे असल्याने ते नक्षलवादाच्या प्रश्नावर जास्त भर देतील अशी अपेक्षा होती, मात्र ते कितीवेळा गडचिरोलीला गेले? असा सवाल विचारून पवार म्हणाले, नक्षली हल्ला झाल्यावर ते तिकडे गेल्याचं दिसले. नक्षलग्रस्त भागावर सरकारचे जास्त लक्ष नसल्याने हल्याची घटना झाली, फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख