शरद पवार आमचे नेते त्यांना भेटण्याचा माझा  हक्क  आहे : अजित पवार

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, आहे आणि यापुढेही राहणार आहे. -अजित पवार
ajit_pawar
ajit_pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार हे माझे नेते आहेत.  त्यांना भेटण्याचा मला हक्क आहे , असे अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

एका प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले , मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच कायम राहणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मला काढण्यात आलेले नव्हते .  आमचा पक्ष जे सांगेल तसेच मी करेन . 

आपण  चार  दिवासांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती  असे विचारले असता , या बाबत  मी नंतर बोलेन , असे अजित पवार म्हणाले . 

गेल्या काही दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या विषयी ज्या बातम्या आल्या  त्याबाबत  अजित  पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . मी कधीही विचार केला नव्हता, अशा गोष्टी माझ्याविषयी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या  आहेत , असे म्हणत  त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

अजित पवार  विधानसभा विधान भवनाच्या दिशेने शपथ घेण्यासाठी निघाले असताना पत्रकारांनी त्यांना थांबवून प्रश्न विचारले होते त्यावेळी ते बोलत होते. 

अजित पवार यांनी सोमवारी रात्री सिल्वर ओक व जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. ही भेट  सुमारे चार तास चालली होती . त्यानंतर आज सकाळी ते विधान भवनाच्या दिशेने आमदार पदाची शपथ  घेण्यासाठी निघालेले आहेत. 

अजित पवार यांनी चार दिवसांपुर्वी धक्कातंत्र अवलंबत पक्षाला अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देत स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्याची प्रतिक्रिया उमटली होती. शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी संबंध नसल्याचे जाहीर करूनही अजित पवार आपली भुमिका बदलायला तयार नव्हते.

त्यामुळे त्यांच्या संपर्कांतील आमदार पक्षाशी जोडून घेण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांत 54 पैकी 51 आमदार पक्षाबरोबर आले. अजित पवार यांच्याबरोबर आमदार न राहिल्याने फडणवीस सरकारला स्पष्ट पराभव दिसत होता.

दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यातच  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याने सर्व समीकरणे बदलून गेली. त्यामुळे सोमवारी  दुपारीच अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला.

फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीची संयुक्त बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करण्यात आले. या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना पक्षाने बरोबर घ्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी अजितदादांच्या जयजयकाराच्या घोषणाही झाल्या. ही बैठक संपल्यानंतरच अजित पवार तातडीने शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com