सोनिया गांधी, ठाकरे यांचे मन वळवून  शरद पवारांनी सरकार बनवले : मुश्रीफ

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही वल्गना केल्या तरी शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असेपर्यंत काही होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार, त्यांनी केलेली कामे हे आपले फार मोठे भांडवल आहे असे हसन मुश्रीफ यांनी येथे सांगितले
Sonia Gandhi - Uddhav Thakrey - Sharad Pawar
Sonia Gandhi - Uddhav Thakrey - Sharad Pawar

नगर : "विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजप व शिवसेना महायुतीच्या बाजूने लागला. त्या वेळी आम्ही विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता करून घेतली होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवून तीन पक्षांचे सरकार तयार केले,'' अशी कबुली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.   

राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या वेळी उपस्थित होते.  

मुश्रीफ म्हणाले, ''विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही वल्गना केल्या तरी शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असेपर्यंत काही होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार, त्यांनी केलेली कामे हे आपले फार मोठे भांडवल आहे. कुणाजवळ काहीही असो 'हमारे पास पवार साहब है'. राष्ट्रवादीला चांगली खाती मिळालेली आहेत हे शरद पवार यांचे यश आहे.'' 

नगर जिल्ह्याचा मोठा वाटा

''जोपर्यंत कार्यकर्त्यांना मानसन्मान देणार नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांना बळकटी व हुरूप येणार नाही. राज्यातील विविध समित्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकांना सरकार आपले वाटत नव्हते. लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर लोकांना सरकार आपले वाटेल. पैसे देऊन काम होते हे विचार लोकांच्या मनातून काढून टाका. लोकांना हे सरकार आपले वाटेल असे काम करा. नगर जिल्ह्याने नऊ जागा देऊन मोठी कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. यापुढेही आपण असेच जोमाने काम करून इतर लहान-मोठ्या निवडणुकांत बाजी मारणार आहोत,'' असे काैतुक करून मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com