Sharad Pawar has not forgotten the names of his friends in early days of politics | Sarkarnama

52 वर्षांपूर्वी राजकारणात साथ देणाऱ्यांची नावे शरद पवार आजही विसरले नाहीत....

कल्याण पाचंगणे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्मृतीत हजारो जणांची नावे आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला.  आपल्या राजकारणाची सुरवात जेथून झाली त्या माळेगावत बोलताना त्यांना 52 वर्षांपूर्वीची नावे लख्ख आठवली. या मित्रांच्या आठवणी जागवताना त्यांच्याविषयी एक `तक्रार`ही केली.

माळेगाव :  बारामती हे शैक्षणिक हब झाले तसे आता वैद्यकिय हब होऊ पाहत आहे. अर्थात बारामती मेडिकल काॅलेज ही त्याची पायरी आहे. खरेतर या कामात अजितचा (अजित पवार) मोलाचा वाटा आहे. आता अजितकडे राज्याचे अर्थ खाते आले असून या मेडीकल काॅलेजचे उर्वरित कामही पूर्णत्वास येईल. यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरात मिळणाऱ्या सुविधा बारामतीत रुग्णांना घेता येतील. महाराष्ट्रात कोठे जर मेडीकल काॅलेजचे माॅडेल पहायचे असेल, बारामतीचे नाव पुढे येईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माळेगावात केले. 

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे बुधवारी झालेल्या एका वैद्यकिय हाॅस्पिटलच्या उद्धाटन कार्य़क्रमात शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे होते.

बारामती तालुक्यात शिक्षणामुळे अनेक मुले शिक्षित झाली त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली. शेवटी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यासाठी सुरवातीपासून अजित पवार यांनी लक्षपूर्वक नियोजन केले आणि बारामतीचे वेगळेपण दिसून आले, असे पवार सांगितले.

पवार म्हणाले, ``एक काळ असा होता, की बारामती शहरानंतर महत्वाचे गाव म्हणजे माळेगाव. त्या काळामध्ये या गावची लोकसंख्या होती तीन ते चार हजार होती. ५२ वर्षांपूर्वी माझ्या राजकारणाची सुरूवात झाली ती या माळेगावातून. या गावानेच मला राजकारण व समाजकारणात उभे केले. भीमदेवराव गोफणे, माधवराव तावरे, भालबाकाका तावरे, मुरलीधर तावरे या माळेगावकरांसह पणदरे-हनुमानवाडीतील धुळाबापू कोकरे, विठ्ठलराव कोकरे, जगन्नाथराव कोकरे यासारख्या तालुक्यातील अनेक मंडळींनी प्रमाणिकपणे सुरवातीपासून मला साथ दिली. माझी त्यांच्याबद्दल एक तक्रार आहे, की हे लोक मला सोडून स्वर्गवाशी झाले,``अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांबद्दल नाराजी...!

या परिसरातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या कारखान्यावर सध्या पवारविरोधी गटाची सत्ता आहे. या निवडणुकीबाबत पवार म्हणाले,`` मी रस्त्याने येताना `शेतकरी बचाव`चा बोर्ड वाचला. हा काय प्रकार आहे, हे मला समजले नाही. कारखान्याचा कारभारही यांनीच करायचा आणि शेतकरी बचावही यांनीच म्हणाचे, हे बरोबर नाही. या बारामतीचा मी आमदार आणि मीच म्हणायचे बारामती बचाव!, हे कितपत योग्य आहे. माळेगाव कारखान्याच्या राजकारणात मी कधी लक्ष घातलं नाही. शेवटी या कारखान्याचा सभासद केंद्रबींदू ठेवून आजवर मी प्रामाणिपणे सहकार्यच करीत आलो आहे आणि आजूनही करणार आहे .त्यामध्ये मी कधीही पाहिले नाही, की या कारखान्याचा अध्यक्ष कोण आहे ते,`` अशा शब्दात सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रमुखांबद्दल नाराजी व्यक्त केली. 

यावेळी माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे, मेडीकल काॅलेजचे डाॅ. तांबे, डाॅ. राजेश कोकरे, रमेश गोफणे, डाॅ. यती कोकरे, डाॅ.रमेश भोईटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख