...  तर तुमच्यावरही ईडीची कारवाई होईल   : शरद पवार 

Sharad-Pawar-Parner
Sharad-Pawar-Parner

पारनेर (नगर)  : " राज्य शिखर बँकेचा व माझा  काडीचाही संबध नाही केवळ माझे व संचालकांचे चांगले संबध आहेत म्हणून माझ्यावर ईडीची कारवाई केली गेली. तुमचेही संचालकांशी संबध असतील  तर तुमच्यावरही ईडीची कारवाई होईल," असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यकर्त्यांना उद्देशून लगावला . 


आज (ता. 8 ) पारनेर नगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पवार पारनेर येथे आले असताना ते प्रचार सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी दिलीप वळसे पाटील होते.


आम्ही सामान्य जनतेच्या भल्यासाठी जेलमध्येही जाण्यास तयार आहोत, असे सांगून श्री . पवार पुढे  म्हणाले,  " युतीच्या सरकारने  अवघ्या 31 टक्के   शेतक-यांचे कर्ज माफ केले.  मात्र काही उद्योजकांचे 78 हजार कोटी रूपये केंद्र सरकारने भरले आहेत. तरी सुद्धा अनेक  उद्योगधंदे  बंद पडत आहेत. हजारो कामगार बेकार होत आहेत. तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे 16 हजार शेतक-यांनी आत्महत्या  केल्या  आहेत."

" अशा शेतकरी व उद्योजक यांच्या  विरोधात  काम करणा-या नाकर्त्या सरकारला त्यांची जागा दाखवून खाली खेचा", असे आवाहन  शरद पवार यांनी केले .

पवार पुढे म्हणाले," शेतक-याला त्यांच्या मालाची किंमत मिळत नसेल, तर हा विकास काय कामाचा?  तुम्ही शेतीची औजारे, औषधे, खते, बी बियाणे याची किंमती का कमी करत नाहीत? कधी तरी शेतक-यांच्या कांद्याला बाजारभाव आला तर लगेचच निर्यात बंद केली. शेतकरी कर्ज माफीचाही सरकारने बोजवारा उडविला आहे. जे लोक शेतक-यांना कष्टाची व घामाची किंमत देत नाही अशा लोकांना मते मागण्याचा काय अधिकार आहे? या सरकारने केलेल्या कर्जमाफीचा सरसकट बोजवारा उडालेला आहे."

" पारनेर दुष्काळी आहे. त्यामुळे अनेक लोक काम धंद्यासाठी गाव सोडून मुंबई ,पुणे, औरंगाबाद अशा शहरात जात आहेत. शेतीची अवस्था गंभीर आहे. मात्र या सरकारला त्याची जाण  नाही. आम्ही अडचणीत आलेल्या सहकारी कारखान्यांना  मदत केली, त्यात आमची काय चुक ? केवळ सत्तेचा वापर करूण सरकार विरोधात बोलणा-यांचे तोंड दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे," असा आरोपही श्री. पवार यांनी केला . 

या वेळी लंके म्हणाले, " राज्यात प्रचाराची सुरूवात पारनेरमधून झाली त्यामुळे परीवर्तन  अटळ आहे.आज दसरा सण आहे रावणाचे दहन  केले जाते . आज ' लंके' च्या हातून रावणाचे दहण जनता केल्याशिवाय रहाणार नाही. मी तालुक्यातील पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे प्रश्न शिक्षण ,  आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सामान्यांचा उमेद्वार म्हणून ऊभा आहे. लोकांच्या सेवेसाठी मला निवडून द्या. " 

माजी आमदार दादा कळमकर, खासदार  दादापाटील शेळके, माधवराव लामखडे, ऊदय शेळके, अशेकशोक सावंत, सबाजी गायकवाड आदींची भाषणे झाली.  

 या प्रसंगी   जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ऊध्वव दुसुंगे, माधवराव लामखडे, ऊदय़ शेळके, रवि वर्पे, बाबाजी तरटे, मधूकर ऊचाळे, प्रशांत गायकवाड  आदी मान्यवर उपस्थीत होते.विक्रम कळमकर यांनी सुत्रसंचलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com