त्या पूरात खुद्द मुख्यमंत्री शरद पवारांनी गाडी चालवली..

शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा विदर्भाशी असलेला हा ऋणानुबंध उलगडवून दाखवला आहे अतुल मेहेरे यांनी
sharad pawar drove car in flood when he was cm
sharad pawar drove car in flood when he was cm

शरद पवार... आज नुसते नाव जरी घेतले तरी मनामनांमध्ये उत्साह संचारतो. गेल्या दोन महीन्यांत राज्याच्या राजकारणात ज्या घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन जे पवार साहेबांना मानत नव्हते, असे लोकही शरद पवारांचे गुणगाण गाताना दिसतात. पवार काय आहेत, हे भल्याभल्यांना कळून चुकले आहे. ही गोष्ट आहे 1993-94 ची. यवतमाळ जिल्ह्याच्या वणीमध्ये महापूर आला होता. परीस्थिती भीषण होती. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. ते वणीत पोहोचले. पण सर्व रस्ते पाण्याखाली होते आणि पवारांसाठी असलेल्या मारुती व्हॅनच्या चालकाची गाडी चालवण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा पवारांनी स्वतः स्टेअरींग हाती घेतले आणि दौऱ्यावर निघाले. तत्कालीन लोकांच्या मनात आजही ही आठवण ताजी आहे.

या दौऱ्यात त्यांनी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 25 ते 30 किलोमीटर गाडी चालवली आणि संपूर्ण तालुक्‍याचा दौरा केला. परीस्थिती जाणून घेतली आणि तात्काळ मदत दिली. नागपूरहून कारने ते वणीला आले होते. कारण त्यांना मार्गातील शेतीचीही पाहणी करायची होती. पुराने झालेल्या नुकसानाचा अंदाज घ्यायचा होता. वणी हे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले गाव. या दोन्ही नद्यांनी तेव्हा उच्छाद मांडला होता. वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरीजामणी हे तिन्ही तालुके पुराच्या पाण्याखाली आले होते. आपल्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत आहेत. हे बघून लोकांना कौतुक वाटत होते. "असाच पाहीजे मुख्यमंत्री', अशी वाक्‍ये लोकांच्या तोंडून निघत होती. आजपासून जवळपास 25 वर्षांपूर्वीचे पवारांचे ते रुप लोकांनी डोळ्यांत साठवले होते. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांची "लीड' अर्थातच शरद पवार होते.

"कसं काय बळीभाऊ, काय म्हणता...'
शरद पवारांच्या स्मरणशक्तीचे, कार्यकर्त्यांबद्दल असलेल्या आत्मीयतेचे दाखले आजही दिले जातात. सामान्यतल्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील ते ओळखतात, नव्हे तर नावाने हाक मारतात. असाच एक 1994 चा किस्सा वणीकरांच्या आजही स्मरणात आहे. राळेगावचे तत्कालिन आमदार नेताजी राजगडकर यांनी वणीमध्ये राज्यस्तरीय आदीवासी सांस्कृतिक महोत्सव घेतला होता. उद्‌घाटक तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यांच्यासह सर्व जण मंचावर बसले असताना तेथे बळीभाऊ सातपुते आले. बळीबाऊ एक सामान्य कार्यकर्ता होता. पवारांनी त्यांना लगेच ओळखले आणि नावाने आवाज देऊन मंचावर बोलावले. "कसं काय बळीभाऊ, काय म्हणता...' असे म्हणत आस्थेने त्यांची चौकशी केली. हा प्रसंग पाहून बळीभाऊंसह उपस्थित सर्व भारावून गेले होते, असे वणीकर आजही सांगतात.

मुख्यमंत्री निधीतून दिले 10 लाख
राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात पवारांच्या लक्षात आले की, येथे एकही थिएटर नाही. तेव्हा लगेच त्यांनी मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. या कामासाठी लगेच निधीही मिळाला. पण तत्कालिन स्थानिक नेत्यांच्या काही चुकांमुळे पुढे हा निधी परत गेला. त्यामुळे ते थिएटर बनू शकले नाही. पण पवारांचे दातृत्व वणीकरांच्या आजही लक्षात आहे.

दादासाहेब हुड आणि शेवाळकरांशी घनिष्ठ संबंध
सत्तेत न राहताही राजकीय मंडळींमध्ये दबदबा असलेले व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब हुड. वणीला आले की दोघा जणांना ते आवर्जुन भेटत. एक म्हणचे दादासाहेब आणि दुसरे म्हणजे साहित्यिक राम शेवाळकर. या दोघांशीही पवारांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या मैत्रीच्या आठवणी आजही जुनेजाणते सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com