ऐंशी वर्षाच्या योध्याने भाजपला सर्व आघाड्यांवर पराभूत  केले !

या विजयाने शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील दबदबाही वाढणार आहे.
sharad-Pawar
sharad-Pawar

मुंबई  : भाजपने आपली सर्व ताकद महाराष्ट्रात सत्ता संपादनासाठी एकवटलेली असताना शरद पवार यांनी अतिशय धैर्याने आणि सर्व कौशल्य पणाला लावून  भाजपला सर्व आघाड्यांवर पराभूत  केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण दिलेली नाही असे म्हणणाऱ्या शरद पवार यांनी अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला पुरते नामोहरम केले आहे.

राजकीय डावपेचात, न्यायालयीन लढाईत आणि तीन पक्षांच्या 162 आमदारांच्या शक्तीप्रदर्शनात श्री. शरद पवार यांनी भाजपला पूर्णपणे पराभूत केले आहे. आम्हाला आखाड्यात जोड लागत नाही, आमच्यासमोर कोणी मल्ल दिसत नाही, असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपच्या तथाकथित मल्लांना ऐंशी वर्षांच्या पहेलवानाने चारीमुंड्या चीत केले आहे.

ईडीच्या ससेमिऱ्याला देशातील अनेक नेते घाबरत असताना शरद पवारांनी ईडीशी संघर्षाचा पावित्रा घेऊन आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही हे विधानसभा निवडणुकीच्या काळातच दाखवून दिलेले होते. निवडणुकीच्या काळात झंजावती प्रचार दौरे करून भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीचा संपूर्ण रागरंगच बदलला होता. शिवसेना आणि कॉंग्रेसला एकत्र आणून त्यांनी अशक्‍य वाटणारी गोष्ट शक्‍य करून दाखवली होती.

शुक्रवारी रात्रीच्या अंधारात जोरदार राजकीय हालचाली झाल्या. अजित पवारांनी बंड केले पण कोणतीही पूर्वतयारी केली नाही . आपल्यामागे किती आमदार आहेत याचा अंदाज अजित पवारांना नेमका आला नसावा . तसेच आधी आपले समर्थक एकत्रित गोळा करून आवश्यक ती  संख्या होते की  नाही याचा अभ्यास न करता अजित पवारांनी बंड केले . भाजपनेही शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस  आमदारावरील प्रभाव विचारात घेतला नाही असे दिसते . 

या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी सकाळी राज्यातील चित्र संपूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकले होते. परंतु शनिवारचा सूर्य मावळेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे 41 नवनिर्वाचित आमदार आपल्याकडे खेचून घेऊन शरद पवारांनी या बंडातील हवा काढून घेतली. रविवारी संध्याकाळपर्यंत अजित पवारांचे निष्ठावंत समर्थक धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या गोटात परतले आणि चित्र स्पष्ट झाले. मोठा गाजावाजा करून दिल्लीला विमानाने गेलेले आमदारही शरद पवार यांनी परत खेचून घेतले.

शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतरची राजकीय परिस्थिती थोडेही न डगमगता आत्मविश्‍वासाने हाताळली. आपल्या राजकीय वाटचालीतील पन्नास वर्षांचा अनुभव पणाला लावून त्यांनी भाजपने केलेला घातक डाव उलटवून लावला. या संपूर्ण लढाईत शरद पवार कुठेही थकलेले निराश झालेले दिसले नाहीत.

भाजपच्या प्रत्येक डावावर शरद पवारांचा प्रतिडाव तयार होता. शरद पवार यांनी अत्यंत वेगवान राजकीय खेळ्या केल्या. शिवसेना आणि कॉंग्रेसला सर्वांत आधी त्यांनी विश्‍वासात घेतले आणि आपले तीन पक्षांचे सरकार नक्की बनेल अशी हमी दिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला हजर राहिलेल्या बारा-तेरा आमदारांपैकी सात-आठ जण तासाभरातच शरद पवारांकडे परतलेलेही होते.

अजित पवार यांच्याकडे असलेले 54 आमदारांचे समर्थनाचे पत्र हे भाजपच्या दृष्टीने ट्रंम्प कार्ड होते. पण शरद पवारांनी सर्व घटनात्मक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आधी अजित पवारांना गटनेतेपदावरून काढण्याचा ठराव संमत करून घेतला. जयंत पाटील यांची गटनेतेपदी निवड केली. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 44 आमदारांचे लेखी निवेदन राज्यपालांना सादर केले आणि सर्वोच्च न्यायालयातही सादर केले.

अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते राहिले नाहीत त्यामुळे त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने गुप्त मतदान न करता खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट झाले. अजित पवार यांच्याविषयी काही जणांना सहानुभूती असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पक्षादेशाच्या विरोधात जाऊन आपली आमदारकी धोक्‍यात घालण्यास कोणीही तयार होणे शक्‍य नव्हते.

याशिवाय "आम्ही 162' हा इव्हेंट करून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी 288 पैकी 162 आमदार त्यांच्या बाजूने आहेत हे सगळ्या जगाला दाखवून दिले. याशिवाय शरद पवारांनी हे गोवा, मणिपूर नाही तर महाराष्ट्र आहे, येथे भलतेसलते खपवून घेतले जाणार नाही अशी तंबीही दिली होती. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाचा प्रभाव या सत्तासंघर्षावर निर्णय घेणाऱ्या राज्यपाल आणि न्यायव्यवस्थेवरही पडला असणारच.

अशा प्रकारे सर्व आघाड्यांवर प्रतिकूलता असतानाही आणि राजकीय डावपेचांना अत्यंत कमी वेळ असतानाही अत्यंत वेगवान राजकीय खेळ्या खेळून शरद पवार यांनी 'पवार म्हणजे पॉवर' हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष शरद पवारांकडे लागलेले होते. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत पवारांना सर्वांत सेटबॅक बसणार का? असे प्रश्‍न उपस्थित होत असताना त्यांनी राज्याच्या राजकारणावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयाने शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील दबदबाही वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com