राफेलचं भूत सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही : पवार  

राफेलचं भूत सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही : पवार  

नांदेड : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पीआरपी, शेकाप आणि मित्रपक्ष महाआघाडीची राज्यातील पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडला बुधवारी (ता. २०) सायंकाळी इंदिरा गांधी मैदानावर झाली. देशाच्या ऐक्य आणि भल्यासाठीच महाआघाडीची स्थापना करण्यात आली असून भाजपच्या सरकारला पराभूत केल्याशिवाय महाआघाडी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

भाजपच्या सरकारने गेल्या पाच वर्षात फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली आणि सगळ्यांनाच फसवलं आहे. त्यामुळेच देशाच्या हितासाठी आणि ऐक्यासाठीच महाआघाडीची स्थापना झाली आहे. भाजपच्या सरकारने राफेलच्या प्रकरणात केलेल्या कोट्यावधीचा घोटाळा आता उघड झाल्यामुळे राफेलचं भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, अमित देशमुख, संपतकुमार, फौजीया खान, कमलकिशोर कदम, अमिता चव्हाण, जयप्रकाश दांडेगावकर, डी. पी. सावंत, अमर राजूरकर आदी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, बहुत हो गई जुमले की मार आवो बदले भाजप सरकार अशी जनता म्हणत असून जनतेची सहनशीलता आता संपली आहे. त्यामुळे बदल अटळ असल्यामुळे आणि महाआघाडी झाल्यामुळेच शिवसेना भाजपने युती केली आहे. घोषणांचा पाऊस आणि सरकारी पैशाची उधळपट्टी भाजप सरकारने केल्यामुळेच सर्वसामान्यांना मोर्चे काढावे लागले. 

श्री. भुजबळ यांचे भाषण घणाघाती झाले. ते म्हणाले की, भाजपने एवढी फसवणुक केली आहे की आता जनता वैतागली असून चहा विका नाही तर काहीही करा पण देश विकू नका, असे म्हणत आहे. माझ्यावर कारवाई केली पण एक लक्षात ठेवा सत्तेच्या जोरावर तुम्ही सगळं करु शकता पण लोकांचे प्रेम तुम्ही जप्त करु शकत नाही. युतीवरही त्यांनी जोरदार टिका केली. जाती जातीत आणि धर्मा धर्मात तर यांनी भांडणे लावलीच पण आता देवा देवामध्ये देखील भाजपवाले भांडण लावत आहेत. त्यामुळे त्यांना आता सरकारमधून हाकलून देवांच्या जाती शोधायला पाठवा, असेही ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com