पवार मोहितेंना म्हणाले आपण दोघे एका रांगेत : खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जागा दाखवू

पवार मोहितेंना म्हणाले आपण दोघे एका रांगेत : खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जागा दाखवू

चाकण : "ज्यांच्या हातात तुम्ही मागच्या वेळी सत्ता दिली, त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. तालुका आणि राज्याच्या भरीव विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे. खेडमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांना विजयी करा. पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यासोबत राहू,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

खेड-आळंदीतील महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ चाकण येथे शुक्रवारी झालेल्या सभेत पवार बोलत होते.

ते म्हणाले की, खेड तालुक्‍यात धरणे झाली, शेती बागायती झाली; पण शेती दिवसेंदिवस कमी झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आराखडा मी केला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव व इतर भागांत औद्योगिक वसाहती झाल्या. त्यात लोकांना रोजगार मिळाला. परराज्यातील कामगारही येथे आला. येथे गुन्हेगारी वाढली. ती मोडीत काढण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. मोहिते यांना निवडून द्या, ते गुन्हेगारी मोडीत काढतील.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ही गर्दी पाहून खेडचा आमदार कोण होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. जसा लोकसभेला मतदारांनी पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा विधानसभेला द्या.

राज्यात शेतीची अवस्था बिकट असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, याला सरकार जबाबदार आहे. उद्योजकांच्या कर्जाची काळजी सरकारला आहे; पण शेतकऱ्यांच्या कर्जाची नाही. मताच्या रूपाने सत्तेत बदल केला पाहिजे. राज्यात आमचे सरकार आले, तर बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

"आपण दोघे एका रांगेत'
शरद पवार यांनी भाषणात "दिलीप मोहिते यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यातून त्यांची सुटका झाली. जसे मोहिते यांचे खोट्या गुन्ह्यात नाव टाकले, तसे माझेही नाव टाकले. त्यांनी खोटे काम केले त्यांना त्यांची जागा दाखवू. आपण दोघे एका रांगेत आहोत, असे म्हणत मोहिते यांना तुमचा विजय नक्की आहे,' असे सांगितले.

मोहिते म्हणाले,""विद्यमान आमदाराने पाच वर्षे तालुक्‍याला विकासापासून वंचित ठेवले. गाडी लावून घ्या, ठेका द्या, स्क्रॅपचा ठेका द्या, अशी कामे तुम्ही, तुमचे भाऊ कंपन्यांत मागतात. आम्ही दादागिरी केली, पण तालुक्‍यातील मुलांना कंपन्यांत नोकरीवर घेण्यासाठी केली. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला.''

या वेळी जयदेव गायकवाड, अनिल राक्षे, रामदास ठाकूर, डी. डी. भोसले, हृषीकेश पवार, बाळशेठ ठाकूर, भास्कर तुळवे, वंदना सातपुते, विजय डोळस, तुकाराम कांडगे, गुलाब गोरे पाटील, प्रकाश भुजबळ, सुदाम शेवकरी, अरुण चांभारे, निर्मला पानसरे, संध्या जाधव, मनोहर वाडेकर, प्रदीप गोतारणे, नंदकुमार वडगावकर आदींची भाषणे झाली.
माजी आमदार राम कांडगे, प्रदीप गारटकर, सुरेखा मोहिते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलास सांडभोर यांनी प्रास्ताविक, सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com