मुघल साम्राज्याला लाथाडणारे छत्रपती कुठे आणि आताचे कुठे : शरद पवार 

मुघल साम्राज्याला लाथाडणारे छत्रपती कुठे आणि आताचे कुठे : शरद पवार 

सातारा : अपमानस्पद वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानी बाणा दाखवत बलाढ्य अशा औरंगजेबाच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. अटकेतून सुटून स्वराज्य निर्माण करत संपूर्ण देशाला शौर्याचा आदर्श घालून दिला. स्वाभिमानासाठी मुघलांच्या सत्तेला लाथाडणारे शिवराय कुठे आणि आज काय चाललेय, राजे हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. 

सातारा जिल्ह्यातील जनतेला सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी लढण्याचे आवाहन करतानाच विकासासाठी जातोय; असे म्हणत पक्ष सोडणाऱ्यांनी दहा-पंधरा वर्षे सत्तेत असताना काय केले, असा सवाल त्यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या साताऱ्यातील मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

साताऱ्यातील दोन्ही राजांनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदा साताऱ्यात आले होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

श्री. पवार म्हणाले, ""पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीला दिल्लीला जावे लागले. तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्‍वासन मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग याने दिले होते. राजे दिल्लीत गेले; परंतु पंचहजारी मनसबदाराच्या, ज्यांना राजेंनी धुळ चारली होती, त्यांच्या मागे त्यांना उभे करण्यात आले. लाचारीची मनस्वी चिड असणारे छत्रपती बलाढ्य अशा औरंगजेबाच्या दरबारातून तडक बाहेर पडले. त्यांना अटकही झाली. परंतु, ते डगमगले नाहीत. 

अटकेतून मोठ्या शिताफीने बाहेर पडले. राज्यात परतून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढा दिला. स्वराज्य निर्माण करून शौर्याचा इतिहास घडवला. अमिषांना न भुलता मुघल साम्राज्याला लाथाडणारे, संपूर्ण जगासमोर स्वाभिमान व शौर्याचा मानदंड उभे करणारे छत्रपती कुठे, आणि आता काय चाललंय...' श्री. पवार हे बोलत असतानाच जनतेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. घोषणाबाजी झाली. त्यानंतर पवार उदयनराजेंना उद्देशून म्हणाले "राजे, हे वागणं बरं नव्हे.' त्यानंतरही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

गुलाल उधळायला बोलवालं? 
80 वर्षाचा म्हातारा काय करणार असे काहीजण म्हणताहेत; पण मी सांगतो, काय पाहिजे ते करायची माझी तयारी आहे. 14 तास काम करायची गरज असेल तर, 20 तास काम करेन, पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ देणार नाही. या जिल्ह्याला क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या स्वाभिमान व शौर्याचा वारसा आहे. छत्रपतींचा काळ असो, की स्वातंत्र्यपूर्व काळ, प्रतिकूल परिस्थीतीत योग्य निर्णय घेण्याची व संपूर्ण देशाला दिशा देण्याची ताकद या मातीत व इथल्या लोकांमध्ये आहे. 

तुम्ही साथ द्या. उद्याच्या 21 तारखेला मतदान आहे. घरोघरी फिरा, सर्वांना बरोबर घ्या, क्रांतीसिंह व यवंतरावांच्या जिल्ह्यात लाचारीला थारा नाही, हे सर्वांना सांगा. विधानसभेच्या सर्व जागांसह लोकसभेमध्येही आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे काम करा असे सांगत गुलाल उधळायला मला बोलवालं अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी उपस्थितीत सर्वांनी हात उंचावून साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. 


दिल्लीतली पगडी नव्हेना.. 
शरद पवार भाषणास उभे राहिले त्यावेळी त्यांच्या शेजारी पगडी घालून तुतारीवाला उभा होता. हा पगडीवाला तुतारीवाला पवारांच्या नजरेतून सुटला नाही. माईकजवळ जाताच त्यांनी तुतारी वाल्याच्या पगडीला हात लावला.

संपूर्ण सभेत एकच गलका उसळला. त्यामुळे भांबावलेला तुतारीवाला खाली बसू लागला. त्यावर पवारांनी त्याला पुन्हा उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर सभेला उद्देशून ते म्हणाले, ""गेल्या आठवड्यात कोणकोणाला पगडी घालत होते, हे मी टीव्हीवर पाहिले. तुम्हालाही कोणी पगडी घातलीय का, असे मी तुतारीवादकाला विचारत होतो, असे श्री. पवार म्हणताच सभेत एकच हशा पिकला. 

लाचारांना तरूण नक्कीच धडा शिकवेल : पवार 
पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना पक्षात घेऊ नका असे सांगत होतो, परंतु शरद पवारांनी तेव्हा ऐकले नाही, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केला.

तो धागा पकडून शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले, ""जयंतराव सांगत होते; परंतु मी वेगळी भूमिका घेतली. त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्याला कारणही तसेच आहे. मला छत्रपतींच्या गादीचा अभिमान आहे. महाराष्ट्र धर्म स्वीकारणाऱ्या, शिकवणाऱ्या माझ्या शिवबाची ही गादी आहे. त्या गादीकडे पाहूनच मी निर्णय घेतला. या राज्याला स्वाभिमानाचा वारसा आहे. आजचा तरूण पेटवून उठलाय. त्याला लाचारीचा रस्ता पसंद नाही. लाचारी स्वीकारणाऱ्यांना तो नक्कीच धडा शिकवेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com