वय ८० वर्षे झाले तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर गेलेली नाही : शरद पवार

मुंबई विभागीय राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने आज मुंबईतील वडाळा येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी युवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली
Sharad Pawar Answers Question By Youth
Sharad Pawar Answers Question By Youth

सातारा : शरद पवारांचे वय 80 वर्षे झाले असे म्हणतात पण माझे वय जरी ८० वर्षे झाले असले तरी माझी विचार करण्याची प्रक्रिया अद्याप तरी 80 च्या वर गेलेली नाही, असे मिस्कील स्पष्टीकरण खासदार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने आज मुंबईतील वडाळा येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी युवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. यावेळी कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक, विद्यार्थी सेलेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍य राणा-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलता शरद पवार म्हणाले, ''माझे वय ८० झाले तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० च्या वर गेलेली नाही. काल २२ फेब्रुवारी ही तारिख होती. ५२ वर्षांपूर्वी याचा तारखेला याच दिवशी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वयाच्या २६ व्यावर्षी आमदार म्हणून निवडून गेलो होतो. आज त्याला ५२ वर्षे झाली, याची आठवण करून देण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत २६ व्या वर्षीही सदस्य होता येते, हे सांगण्यासाठी आहे.'' यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली.

ही प्रश्नोत्तरे अशी - 

प्रश्‍न : पाच ते सहा हजार तरूण आज तुमच्या सोबत आहेत. त्याच्याकडे पाहून तुम्हाला तुमच्या तरूणाईतील काही आठवण होते का

शरद पवार : अभ्यास सोडून सगळ्या गोष्टीत मी पारंगत होतो. खेळ, नाटके आयोजित करणे जाणकारांची व्याख्याने आयोजित करणे, महाविद्यालयाच्या निवडणुका जिंकण्यासाठी जे जे करावे लागले ते करणे. या सर्व गोष्टीत माझा महाविद्यालयीन वेळ गेला. त्यामुळे चार वर्षाचा कोर्स मी पाच वर्षात पूर्ण केला. त्यासाठी महाविद्यालयात एक वर्ष अधिक मुक्काम टाकावा लागला. माझी सार्वजनिक जीवनाची सुरवात या विद्यार्थी चळवळीतून झाली. त्यावेळचे सर्व मित्र आजही जे हयात आहेत. त्यांच्याशी मी भेटतो बोलत असतो.

प्रश्‍न : तुम्ही युवा पिढीचे हिरो आहात, तुमच्याविषयी युवकांत प्रचंड आकर्षण आहे. तुम्हाला युवा पिढीबाबत काय वाटते.

शरद पवार : देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद युवा पिढीत आहेत. देशाची भवितव्य घडविण्याचे कुवत आणि युक्ती महाराष्ट्रातील युवकांत आहे. त्यांना प्रोत्सहान दिले पाहिजे. त्यासाठी सध्याच्या सरकारने प्रयत्न करायला हवेत.

प्रश्‍न : 52 वर्षाच्या कालखंडात नेते व कार्यकर्ते यांच्यात काय बदल झाला असे तुम्हाला वाटते.

शरद पवार : विरोधी पक्षासह सरकारमध्ये ही काम करण्याची संधी मला मिळाली. सत्तेच्या प्रांगणात अनेक वर्षे राहिलो. विरोधी पक्षाचीही जबाबदार आली आणि संघर्षाचे राजकारण करण्याची संधी मिळाली. राजकिय वाटचालीत अनेक चढउतार येत असतात. चढत्या कमानींत यशस्वी झाला तरी तुमचे पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. पराभव झाल्यास ना उमेद न होता पुन्हा जिद्दीने उभे राहून पुढे जाणे गरजेचे आहे.

प्रश्न : कोणत्या वेळी काय करावे, हे शरद पवार साहेबांना माहित असे सर्वजण म्हणतात ते तुम्हाला कसे समजते.

शरद पवार : हा जरा वेगळा प्रश्‍न आहे. पत्रकार मित्र माझ्याविषयी नेहमी लिहितात की पवार साहेब काय करतील सांगता येत नाही. नेमकी परिस्थिती जाणून आव्हानाला सामोरे जाताना अचूक पावले टाकली तर योग्य होते. ना उमेद न होता मागे कधीच फिरायचे नाही.

प्रश्न : युवकांना कौशल्य शिक्षण कसे मिळेल. शिक्षण पध्दतीत कोणते बदल व्हायला हवेत का.

शरद पवार : अभ्यासक्रमात बदल केले पाहिजे. कारण आगामी काळात समोर येणाऱ्या आव्हानाला तोंड देणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपुढे ठेवले पाहिजे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांमध्ये आणि नवीन पिढी यांच्यातील सुसंवादातून नवीन अभ्यासक्रम निर्माण झाला पाहिजे.

प्रश्‍न : सध्याच्या राजकारणात चुकीची पध्दत आली आहे का.

शरद पवार : ही लोकशाही आहे, लोकांना त्यांचा आवडीचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. उत्तर प्रदेशात असे काही करतात ते एकुण आपण सर्वजण थक्क होतो. या सर्वांना आवर घालण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी जागृत राहिले पाहिजे. चुकीच्या प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवले पाहिजे.

प्रश्‍न : महाविद्यालयीन निवडणुका असाव्यात की नसाव्यात.
शरद पवार : महाविद्यालयीन पातळीवर निवडणुक प्रक्रिया असणे योग्य आहे. यातून लोकशाहीची प्रक्रिया अशी चालते हे विद्यार्थी देशतच समजते. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्याबाबतची काळजी राज्य सरकारने घ्यावी.

प्रश्‍न : मुंबईतील औद्योगिक क्षेत्र अकुंचित झाले आहे. केवळ सेवा क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत. मग इंजिनिअरींग क्षेत्रातील युवकांना नोकऱ्या मिळणार का.

शरद पवार : मुंबईत सर्वसामान्य माणूस कमी होऊन 35 मजली इमारतीत राहणारा वर्ग वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा चेहरा मुंबईत राहिलेला नाही. सध्या मुंबईत सर्व्हिस सेक्‍टर वाढत आहे. या त्यामुळे सेक्‍टरवर ताबा मिळविण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com