चमत्कारित नेतृत्वामुळे संस्थेचे कसे वाटोळे होते याचे उदाहरण म्हणजे यशवंत साखर कारखाना : शरद पवार

  चमत्कारित नेतृत्वामुळे संस्थेचे कसे वाटोळे होते याचे उदाहरण म्हणजे यशवंत साखर कारखाना : शरद पवार

उरुळी कांचन : सहकारी संस्थेचे नेतृत्व चांगले असेल तर त्या संस्थेसह संस्थेच्या कार्यक्षेत्राचाही मोठा विकास होतो. मात्र नेतृत्वच 'चमत्कारिक' असेल तर संस्थेसह परीसराचेही वोटोळे झाल्याशिवाय रहात नाही. 'चमत्कारिक नेतृत्वामुळे चांगल्या सहकारी संस्थेचे वाटोळे कसे होते' यांचे ज्वलंत व मुर्तीमंत उदाहरण थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखऱ कारखाना आहे अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जाहीर कार्यक्रमात केली. 

'यशवंत' च्या नेतृत्वामुळे कारखान्याचे पर्यायाने या परीसराचे वाटोळे झाले असले तरी, त्याचा परीणाम मात्र थेट पूर्व हवेलीमधील उस उत्पादक सभासदांना मोठ्या प्रमानात भोगावे लागत आहेत. यामुळे पूर्व हवेलीमधील ऊस उत्पादक सभासदांचा व या परिसराच्या हिताचा विचार करुन, कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे असे आश्वासनही शरद पवार यांनी यावेळी दिले. 

उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सांगता सोहळ्यासाठी श्री. पवार शनिवारी (ता. 15) उरुळी कांचन येथे आले होते. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात पुर्व हवेलीमधील शेतकरी सभासदांच्यावतीने डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना चालु करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. 

शरद पवार म्हणाले, की सहकारी चळवळीचे अथवा सहकारी संस्थांचे नेतृत्व चांगले असेल तर संबधित सहकारी संस्थेसह संस्था ज्या भागात काम करते त्या भागाचाही मोठ्या प्रमानात विकास होतो. याचे उदाहरण म्हणजे सातारा कोल्हापुर, पुणे जिल्हातील अनेक सहकारी संस्था व त्या संस्थांचा परिसर आहे. मात्र नेतृत्वच 'चमत्कारिक' असेल तर मात्र संस्था दिवाळखोरीत निघाल्याशिवाय रहात नाहीत. संस्था उभी असलेल्या परिसराचा विकासही थांबतो. याचे ज्वलंत उदाहरण यशवंत कारखाना आहे. 


वीस वर्षापूर्वी संपुर्ण राज्यात सहकारी साखर कारखानदारीत यशवंत कारखान्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते. राज्यातील अनेक कारखान्यांनी या कारखान्याच्या कामतकाजाचा अभ्यास करुन, आपआपल्या कारखान्यांची प्रगती घडवून आणली. मात्र त्यानंतर कारखान्याचे नेतृत्व केलेल्या मंडळींच्या चुकामुळेच कारखान्याचे पर्यायाने संपुर्ण पुर्व हवेलीचेही नुकसान झाले हे वास्तव नाकारुन चालणार नाही. नेतृत्वाबद्दल स्पष्टपणे बोलल्यामुळे काहीजण नाराज होऊ शकतात, मात्र वास्तव मांडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

कारखान्याची जागा बदलण्याची सुचना... 
दरम्यान पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणाबद्दल बोलतांना पवार म्हणाले, फुरसुंगी, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह थेऊर परीसरातील वाढत्या नागरीकरणामुळे या भागातील उस उत्पादन दिवसेंदिवस कमी होणार असल्याने, कारखान्याची जागा बदलण्याची वेळ आली आहे. उस उत्पादन हे नदीच्या पलिकडे मोठ्या प्रमाणात होत असल्याने, भविष्यकाळाचा विचार करुन कारखान्याचा जागा बदलावी असे मला वाटते. याबाबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन, त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. जागा बदलण्यास शेतकऱ्यांनी होकार दिल्यास, वरील निर्णय राज्य सरकारच्या मदतीने निर्णय घ्यावा लागेल असेही पवार यांनी स्पष्ठ केले. दरम्यान शरद पवार यांच्याकडून कारखान्याच्या चुकीच्या कारभाराबद्दल कान उपटले जात असतांना, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी उपाध्यक्ष सुरेश घुले, माधव काळभोर, राजेंद्र टिळेकर, महादेव कांचन, रामदास चौधरी यांच्यासह अनेक माजी संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com