शाहू समाधी समता, लोकशाही, आधुनिकतेसाठी प्रेरणादायी : शरद पवार

शाहू समाधी समता, लोकशाही, आधुनिकतेसाठी प्रेरणादायी : शरद पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपतींचे हे समाधी स्मारक नव्या पिढीला समता, लोकशाही,आधुनिकता आणि विकास यांची सतत प्रेरणा देत राहील, असा विश्‍वास माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला. महापालिकेने नर्सरी बाग, सिध्दार्थनगर येथे उभारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज होते. गर्दीने खचाखच भरलेल्या ऐतिहासिक दसरा चौकात हा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी शाहू समाधी स्मारक स्थळ नर्सरी बाग येथे लोकार्पण सोहळा पार पडला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील, यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.महापौर ऍड.सूरमंजिरी लाटकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

श्री. पवार म्हणाले," भारतात राजे आणि संस्थाने अनेक होउन गेले. पण दोन राजे या देशाच्या कायमस्वरुपी लक्षात राहतील आणि प्रेरणा देत राहतील, त्यातील एक म्हणजे छत्रपती शिवराय ज्यांनी सर्व मावळ्यांना संघटीत करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तर त्यांचे हे काम सतत प्रेरणा देत राहते. दुसरे म्हणजे आपल्याकडे असणारी राजसत्ता ही आपली नसून ती लोककल्याणासाठीच आहे. समाजातील,उपेक्षित, दुर्लक्षीत,शोषित घटकांना याचा लाभ कसा होईल,हे सुत्र घेउन ज्यांनी काम केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून हे दोन्ही राजे महाराष्ट्रभर मर्यादीत न राहता. त्यांच्या कर्तृत्वामुळे सर्व देशभर लोकप्रिय ठरले. उत्तरप्रदेशात तर छत्रपती शाहूंच्या नावाचा एक जिल्हाच आहे.उत्तरप्रदेशात शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचाराचे लोक घराघरात असल्याचे पहायला मिळाले. 
समता प्रस्थापित करणारा राजा 
शरद पवार म्हणाले, छत्रपती शाहू महाराज एकदा आपल्या बग्गीतून जात असताना ती बग्गी पाहण्यासाठी आलेला महार समाजातील एक मुलगा बग्गीचा धक्का लागून जखमी झाला. शाहू महाराज स्वता बग्गीतून उतरले आणि त्यांनी त्या मुलाला खांद्यावर घेउन त्याच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यावेळी महाराजांच्या इतर सेवकांनी तो मुलगा महार समाजातला आहे, त्याला कशाला उचलून घेतले, असे महाराज यांना म्हणताच, छत्रपती शाहूू संतप्त झाले. आपल्या रयतेतील एक मुलगा जखमी असताना त्याची जात काढता, हे बरोबर नाही, हे मी सहन करणार नाही,असे ठणकावून सांगीतले होते. छत्रपती शाहू हे समतावादी होते, जात, पात, धर्म न मानणारे होते. सर्व जातीधर्मातल्या मुलांसाठी त्यांनी वसतीगृहे उभी केली. गंगाराम कांबळे सारख्या महार समाजातील तरुणाला हॉटेल काढून दिले. त्या हॉटेलमध्ये ते स्वतः चहा प्यायला जात असत इतर सहकाऱ्यांनाही चहा पाजत असत. त्या काळात अस्पृश्‍यता निवारण्याचे हे मोठे काम छत्रपती शाहूंनी केले. याचा उल्लेखही पवार यांनी आवर्जून आपल्या भाषणात केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com