वंचितच्या बाजुला गेलेला दलित व नवबौद्ध समाज राष्ट्रवादीकडे आणणार - शरद पवार

वंचितच्या बाजुला गेलेला दलित व नवबौद्ध समाज राष्ट्रवादीकडे आणणार - शरद पवार

मुंबई : वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही हे पाहिले नाही त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. आता आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल असा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. विधानसभेची निवडणूक झाली. निकाल संमिश्र लागला. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे हे लोकांनी लक्षात आणून दिले आहे असेही शरद पवार म्हणाले. तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर त्यानी केला असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला. 

माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो त्यावेळी मी स्वतः चे काम तपासून घ्यायला हवे अशी कबुली शरद पवार यांनी दिली. तरुणांनी पक्षाला चांगला पाठिंबा दिला. मुळात यावेळी अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र काही ठिकाणी आपण मागे पडलो अशी स्पष्ट कबुलीही शरद पवार यांनी दिली. 

समाजातील जो गरीब वर्ग आहे तो वंचितच्या मागे उभा राहिला. लोकसभेत पाठिशी राहिला.त्यामुळे ती ताकद दिसून आली मात्र जो मुस्लिम समाज वंचितच्या पाठिशी राहिला तो विधानसभेत मुस्लिम समाज बाजुला गेला तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला असे शरद पवार यांनी सांगितले. इगतपुरी येथे आदिवासी समाज पाड्यात गेलो. तिथे सत्ताधाऱ्यांबद्‌द्‌ल राग पाहायला मिळाला असा किस्सा सांगतानाच या सर्वांना संघटीत करावं लागणार आहे. त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास दिला पाहिजे असे काम आपल्याला करायचे आहे असेही शरद पवार म्हणाले. 

काही ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत. तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे तिथे नव्याने संधी दिली पाहिजे त्यावेळी तो जोमाने काम करेल असेही शरद पवार म्हणाले. एससी व एसटी या समाजाच्याठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे. मुंबई, ठाणे याठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता एकच जागा मुंबईत आली आहे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या.महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे हे लक्षात आणुन देवुया असे ावाहन शेवटी शरद पवार यांनी केले. 

नव्या उमेदीने तयारीला लागा -अजित पवार 
अपयशाने खचून जावू नका. नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागा असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. सर्वांनी कडवी झुंज दिली. मात्र जय - पराजय हा सन्मानजनक असावा. राष्ट्रवादीचा सन्मानजनक विजय झाला आहे असेही अजित पवार म्हणाले. अमोल कोल्हे, अमोल मेटकरी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला त्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले. काही जिल्हयांनी ताकद दिली तर काही जिल्हयांनी ताकद दिली नाही त्यामुळे त्या जिल्ह्यात पराभव पत्करावा लागला आहे. ज्या - ज्या जिल्हयात परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आम्ही दौरा सुरु करत आहोत. लोकांच्या मागे धावून जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे असेही स्पष्ट केले. पाच जिल्हयात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत असून तिथे बांधणी आतापासूनच करायला लागा असे आवाहनही केले. 

तुमच्याच मनात संभ्रमावस्था असेल तर तुम्हाला लोकांनी का मतदान करावे असा सवाल करतानाच शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आणि तुम्ही असं वागलात तर कसं होईल असेही अजित पवार म्हणाले. आता पक्ष सोडून गेलेले पुन्हा येवू का... येवू का... असं विचारु लागले आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी खिल्ली उडवली. तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे. पक्ष वाढवा. मागे हटू नका. त्या त्या जिल्ह्यात समीकरणे जुळवली जातील असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले. 
बारामतीत मला का लीड मिळते. याची माहिती घेण्यासाठी तुम्ही बारामतीत एकदा तरी या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. 

विविध आयुधांचा वापर करून विधानसभेत आणि लोकसभेत सरकारला नक्कीच सळो की पळो करुन सोडणार आहोत असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. 
पराभूत झालेले लोक विधानपरिषदेवर घ्या असं सांगायला येतील. त्यांनी त्या स्वप्नात राहू नका. अच्छे दिन येतील या भ्रमातही राहू नका असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. 
पक्ष पाठीशी ठामपणे उभा राहिल - जयंत पाटील 
आपण राज्यात चांगली लढत दिली आहे. काही ठिकाणी कमी फरकाने पराभव झाला. त्यातून खचून न जाता नव्या दमाने उभे रहा पक्ष तुमच्या पाठीशी ठाम उभा राहिल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिले. चांगले प्रयत्न करुन आपण विधानसभा लढवली आहे. एक्‍झिट पोल आले त्यावेळी राष्ट्रवादी 20 ते 25 जागीसुद्धा निवडून येणार नाहीत. परंतु 63 ते 64 जागा येतील अशी मला खात्री होती असेही जयंत पाटील म्हणाले. पवारसाहेब महाराष्ट्रात फिरले आणि राज्यातील वातावरण फिरले. आम्ही अनेक नवीन चेहरे दिले ते येतील असा कयास होता परंतु काही पराभव जिव्हारी लागले आहेत. काही फरकाने हे पराभव झाले आहेत.बुथ कमिटयांनी लक्ष ठेवण्याचे काम केले. बुथ कमिटयांचे सैन्य कमी पडले तिथे पराभव झाला असेही जयंत पाटील म्हणाले. 
यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पराभव झालेल्या उमेदवारांनी आपले विचार मांडले. यामध्ये शशिकांत शिंदे, राजीव देशमुख, दिपिका चव्हाण, बबलु चौधरी, दत्तात्रय बोरुडे, उत्तमराव जानकर, संजय कदम, धनंजय पिसाळ, ज्योती कलानी, प्रभाकर देशमुख, प्रकाश तरे,सचिन दोडके, घनश्‍याम शेलार यांचा समावेश आहे. विधानसभेत काही फरकाने व दुसऱ्या क्रमांकावर पराभव झालेल्या राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी पराभवाची कारणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com