मला बघितले की नामदेवराव हसणार आणि झालेही तसेच!

देव, ज्योतिषी, कर्मकांड यापासून श्री. पवार नेहमीच अलिप्त नव्हे तर चार हात लांबच राहीले. पण केंद्रीय कृषीमंत्री असताना एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अंबाबाई मंदीराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले होते.
sharad pawar and kolhapur
sharad pawar and kolhapur

कोल्हापूर : राजकारणात पन्नास वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. राज्यात तर त्यांना वगळून राजकारणही करता येत नाही याचा धडा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या घडामोडीवरून दिसून आला. अशा दिग्गज व्यक्तीमत्त्व असलेल्या श्री. पवार यांचे कोल्हापुरशी नातेही अतिशय घट्ट आणि प्रेमाचे आहे.

ज्या ज्यावेळी कोल्हापूरवर पूर असो किंवा अन्य नैसर्गिक संकट, त्या त्यावेळी पहिल्यांदा कोल्हापुरकरांच्या मदतीला धावून आलेले राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार हेच. 1999 साली श्री. पवार यांना कॉंग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. दिल्लीहून पुणे विमानतळावर आल्यानंतर श्री. पवार यांना ही माहिती समजली. पत्रकारांनी विमानतळावरच त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी तुमच्याकडूनच ही माहिती समजल्याचे सांगत जास्त बोलण्याचे टाळले. पण तेथून श्री. पवार थेट कोल्हापुरात आले. त्यावेळी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात त्यांना मानणाऱ्या आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांचा मोठा वर्ग होता. कोल्हापुरात आल्यानंतर दिवंगत मंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन नव्या पक्षाची मुहुर्तमेढच रोवली. पुढे काय झाले हा इतिहास ताजा आहे पण राष्ट्रवादीच्या स्थापनेचे मूळ हे कोल्हापूरच आहे.

कोल्हापुरच्या कोणत्या तालुक्‍यात काय पिकते, तेथील पिकांची स्थिती, प्रमुख नेते, कार्यकर्ते कोण, कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत, त्या कारखान्यांची अर्थिक स्थिती अशी इत्यंभूत माहिती असणारा एकमेव नेते म्हणजे शरद पवार. सत्ता असो किंवा नसो पण श्री. पवार ज्या ज्यावेळी कोल्हापुरात आले, त्या त्यावेळी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या भोवतीचा गराडा हा कायम राहीला आहे. कागलमध्ये एका सभेत इतरांची भाषणे सुरू असताना त्यांची नजर मात्र समोर कोण बसले आहे याचा शोध घेत होती. याच सभेत माजी आमदार नामदेवराव भोईटे हे प्रेक्षकांत बसलेले त्यांना दिसले, त्यांनी हातानेच इशारा करून श्री. भोईटे यांना व्यासपीठावर येण्याची खूण केली. यावरून त्यांची नेते, कार्यकर्त्यांविषयी असलेली आपुलकी दिसून येते. 

श्री. भोईटे हे सहज जरी भेटले तरी बोलणे कमी आणि हसणे जास्त असायचे. मध्यंतरी श्री.भोईटे दवाखान्यात होते, त्याचवेळी श्री. पवार हेही कोल्हापुरात होते, त्यांना श्री. भोईटे हे रूग्णालयात असल्याचे समजताच त्यांनी आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार यांच्यासह दवाखाना गाठला. आत जातानाच त्यांनी आर. के. पोवार यांना सांगितले की मला बघितले की नामदेवराव हसणार आणि झालेही तसेच. यावरून नेते कार्यकर्त्यांच्या बारीकसारीक सवयीही त्यांना माहिती होत्या. यापैकीच एक म्हणजे उद्योजक व्ही. बी. पाटील, त्यांच्या घरी मटणाचे जेवण म्हणजे त्यांच्या दौऱ्यातील ठरलेला कार्यक्रम. अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत व्ही. बी. हे विरोधकांच्या प्रचारात असल्याचा संदेश कोणीतरी श्री. पवार यांना त्यांच्या मोबाईलवर पाठवला, त्याचदिवशी नेहमीप्रमाणे ते व्ही. बी. यांच्या घरी जेवायला होते, जेवणापुर्वीच त्यांनी हा मेसेज व्ही. बी. यांना दाखवला आणि सगळेच हास्यकल्लोळात बुडाले. आर. के. पोवार, श्री. मुश्रीफ यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व श्री. मुश्रीफ यांच्या वादात नुकसानीची पर्वा न करता त्यांनी श्री. मुश्रीफ यांची बाजू घेतली. त्याची किंमत 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोजावी लागली. म्हणूनच भाजपाची ऑफर असतानाही 'शरद पवार एके शरद पवार' म्हणत श्री. मुश्रीफ यांनी आपली पवारनिष्ठा कायम ठेवली.

हॉटेल पंचशील आणि तेथील 402 क्रमांकाची खोली हे श्री. पवार यांचे कोल्हापुरातील वास्तव्याचे ठिकाण. हॉटेल कॅसलमधील मटण ही त्यांची आवडती डिश. मी मटण खातो ते फक्त कोल्हापुरातच कारण इथल्या मटणात चवच वेगळी असल्याचा त्यांचा दावा. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील हे त्यांचे मेव्हणे (बहिणीचे पती), साडू कै. रणजित जाधव हे कोल्हापुरचेच तर पुतणी सौ. विजया पाटील यांचेही वास्तव्य कोल्हापुरातच. गोलीवडे (ता. पन्हाळा) हे त्यांच्या मामाचे घर. या सर्व पै पाहुण्यांकडे त्यांचा अधूनमधून दौरा हा ठरलेला असतो. मुंबई असो किंवा पुण्याहून कोल्हापुरचा त्यांचा दौरा हा निवडणूक काळातील अपवाद सोडला तर नेहमी कारने. यामागचा उद्देश एकच की रस्त्याने जाताना दुतर्फा फुललेली उसाची, भाताची आणि इतर पिकांची शेती त्यांचा आवडीचा विषय. वाटेत थांबून एखाद्या पिकांबाबत आस्थेने चौकशी करण्याची त्यांची सवय आजही कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com