शरद पवार यांनी शेतकऱ्यांना आश्‍वस्त केले, ते म्हणाले, " काळजी करु नका आता मी आलो आहे '

शरद पवार यांनी शेतकऱ्यांना आश्‍वस्त केले, ते म्हणाले, " काळजी करु नका आता मी आलो आहे '

घोटी : परतीच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली, त्याच्या पाहणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आज थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. टाके घोटी (इगतपुरी) येथे त्यांनी भात शेती नष्ट झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी येथील शेतकरी महिला यमुनाबाई दालभत त्यांना म्हणाली. " मोदींचे अच्छे दिन का काय म्हणतात ते हेच का हो साहेब ? शेतकरी रडतोय पण त्यांना कोणी वाली नाही.' यावर उपस्थितांसह सगळ्यांच हसू आवरले नाही. पवार साहेब म्हणाले, " म्हणूनच मी आलो आहे. काळजी करु नका' असा दिलासा दिला. 

राज्यात परतीच्या पावसाने शेती व शेतकरी दोघांना उध्वस्त केले आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजप, शिवसेना नेते सत्तेच्या सोंगट्या पुढे मागे करण्यात व्यस्त आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत धुवांधार बॅटींग केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र थेट शतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. आज सकाळी त्यांनी इगतपुरी तालुकतील मुंबई आग्रा महामार्गावरील टाके घोटी गावाला भेट देऊन भातशेतीच्या नुकसानीची माहिती घेतली. 

अनेक शेतकरी, महिला त्यांच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने जमले होते, श्री. पवार आल्यावर त्यांनी तपशीलवार माहिती दिली. यावेळी राजाबाई आडोळे या महिलेच्या शेताची पाहणी केली. यावेळी पवारांनी सहकाऱ्यांना सूचना देऊन त्याचा तपशील नोंदवुन घेतला. यावेळी श्रीमती दालभगत या शेतकरी महिलेने भातशेतीची सगळी माहिती दिली. सरकार आमच्या प्रश्‍नांची कधीच दखल घेत नाही. अधिकाऱ्यांकडे जाउन काहीच फायदा होत नाही. भाताचे पीक गेल्यावर दुसरे पीक घेता येत नाही. इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती पावसाने केली आहे. मोदी साहेब सांगतात ते अच्छे दिन हेच का हो साहेब ?' असा प्रश्‍न त्यांनी केला. त्यावर शरद पवार म्हणाले, "मी आलोय काळजी करू नका शेतकरी बांधवांनो तुमच्या हितासाठी रात्रीचा दिवस न थकता सुरू आहे. बळीराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. घाबरु नका. आत मी आलो आहे. मार्ग काढू. असा दिलासा दिला. तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. आमचे पदाधिकारी तुमच्या सोबत राहतील. 

यावेळी आमदार हिरामण खोसकर, सुधीर तांबे, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, माजी खासदार देविदास पिंगळे, कॉंग्रेसचे नेते संपत सकाळे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना भाकड उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com