उमेदवारी हवी; तर खासगीत सांगायचे : शरद पवार यांचा ऋषीकेश पवार यांना सल्ला 

उमेदवारी हवी; तर खासगीत सांगायचे : शरद पवार यांचा ऋषीकेश पवार यांना सल्ला 

चाकण ः "उमेदवारी हवी; तर खासगीत सांगायचे. या गोष्टी चारचौघांत बोलायच्या नसतात,'' असा सल्ला ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

 वडगाव घेनंद (ता. खेड) येथे माजी आमदार (कै.) नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार पवार यांचे नातू ऋषीकेश यांनी खेड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी प्रास्ताविकात केली.

ऋषीकेश  म्हणाले, ""तुमचा नातू रोहित पवार यांना विधानसभेची उमेदवारी देत आहात. मीही तुमचा नातू आहे, मला खेडच्या उमेदवारीची संधी द्यावी.'' त्यानंतर भाषणात शरद पवार म्हणाले, ""इच्छा प्रत्येकाने व्यक्त करायची असते. मला खासगीत सांगायचे. ऋषीकेश, तुम्ही जरा थांबा.'' येत्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या ऋषीकेश पवार यांना उमेदवारी मिळते की नाही, हीच चर्चा त्यानंतर तालुक्‍यात रंगली आहे.

या कार्यक्रमात माजी आमदार पवार यांचे समर्थक काळूराम कड व इतरांनी भाषणात ऋषीकेश पवार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा राक्षे यांनी सांगितले, की माजी आमदार दिलीप मोहिते यांनी थांबावे व दुसऱ्यांचे नाव सुचवून त्यांना संधी द्यावी. पक्षाने नवा चेहरा द्यावा. 

ऋषीकेश पवार म्हणाले, ""मी माजी आमदार पवारांबरोबर पाच वर्षे फिरलो आहे. मला तालुका पूर्ण माहिती आहे. मतदारसंघात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मला पक्षाने संधी द्यावी.'' 

त्यानंतर शरद पवार म्हणाले, ""कार्यक्रमाला खेड तालुक्‍यातील प्रत्येक नेत्याला बोलवायचे. त्यांचा मानसन्मान करायचा. पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांसमोरच मला उमेदवारी द्या, असे म्हणायचे. बोलताना थोडी काळजी घेतली पाहिजे. मला येथे बाबा राक्षे, दिलीप मोहिते दिसतात, तेही इच्छुक आहेत. या गोष्टी चारचौघांत बोलायच्या नसतात. खासगीत सांगायच्या असतात. मात्र, पक्षाने एखाद्याला उमेदवारी दिली, तर त्याला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com