मी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केलं असतं: शरद पवार - sharad pawar about elgar parishad | Politics Marathi News - Sarkarnama

मी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केलं असतं: शरद पवार

अमोल कविटकर
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

पुणे : ''मी जर राज्यकर्ता असतो, सत्तेत असतो. तर ज्यांनी एल्गार परिषदेच्या लोकांवर खटला भरला, त्या पुण्याच्या आयुक्तांना मी निलंबित केलं असते. त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही", असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पुण्यात शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात 'शिवगौरव' आणि 'शिवसन्मान' पुरस्कार वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, "मला काही समजत नाही. या देशात लोकशाहीमध्ये घटनेने आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. त्या मताशी तुम्ही सहमत नसाल, तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. अशा प्रकारची भाषणे केली, तशा प्रकारची भाषणे केली म्हणून काहींना महिनोनमहिने डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो".

"देशात सुप्रीम कोर्ट आहे म्हणून बरं आहे. सुप्रिम कोर्ट सुनावणी करत असताना अधिकारी काही वेगळी कलम लावता येतील का? या प्रकारची पावलं टाकतात. हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे आपल्याला एकत्रित विचार करावा लागेल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. महाराष्ट्रात हे चालणार नाही", असेही पवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख