sharad pawar | Sarkarnama

राज्यात निवडणुकीची शक्‍यता नाही,  देवेंद्र फडणवीस वादातीत : शरद पवार

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 27 मे 2017

नागपूर ः भाजप आणि शिवसेनेत भांडणे होत राहतील; पण निवडणुकीची शक्‍यता वाटत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारबाबत इतक्‍यात कुठले मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही; पण आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सकारात्मक अथवा नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. वादातीत राहण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असे निरीक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आज नोंदविले. 

नागपूर ः भाजप आणि शिवसेनेत भांडणे होत राहतील; पण निवडणुकीची शक्‍यता वाटत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारबाबत इतक्‍यात कुठले मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही; पण आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सकारात्मक अथवा नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. वादातीत राहण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असे निरीक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आज नोंदविले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पवार नागपूरमध्ये आले आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. 

"यूपीए'च्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा फायदा झाला. बऱ्याच शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली. नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतीचे उत्पादन वाढून गहू, साखर, कापूस निर्यात करण्याची देशाची क्षमता निर्माण झाली. शेतमालास योग्य भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीत. यासंदर्भात मी अनेक शेतकऱ्यांशी बोललो आहे. त्यांची कर्जमाफीची मागणी नाही. योग्य भाव मिळाला तरी त्यांना ते पुरेसे आहे, असे ते म्हणाले. 

मी कुठेही राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाही. विरोधी पक्षनेत्यांच्या शुक्रवारी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय सामंजस्यातून राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरावा, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी सत्ताधारी पक्षाने विश्वासात घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विरोधी पक्ष वेगळा उमेदवार देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 
..................... 

पवारांनी "एनडीए'मध्ये यावे ः आठवले 
आजवर सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार राष्ट्रपती झाला आहे. आजही तीच परिस्थिती कायम असल्याने सर्व विरोधक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायचे असेल, तर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

नितीन गडकरी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी नागपूरला आले असता आठवले यांनी रविभवन येथे पत्रकारांशी चर्चा केली. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, त्यावर मत विचारले असता आठवले यांनी, त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार होऊ नये असे सांगितले. पवार कधीही हरण्यासाठी लढत नाहीत, त्यामुळे त्यांनी "एनडीए'मध्ये सहभागी होणेच योग्य राहील, असेही ते म्हणाले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख