sharad pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या मुख्यालयाचे वीज, पाणी तोडले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कामात संपूर्ण सहकार्य करण्याचा करार केल्यानंतरही मेट्रो प्रशासनाच्या सूचनेवरून मुंबई महापालिकेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयाचे वीज-पाणी शनिवारी (ता. 22) तोडले. त्यामुळे पक्षाचे कामकाज ठप्प झाले असून, तातडीने कार्यालयाचे स्थलांतर करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. 

राजकीय मैदानात सततची होणारी पडझड रोखण्यात अजूनही यश येत नसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता हा नवीन दणका बसला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे एकमेव सुसज्ज व प्रशस्त असे पक्षाचे मुख्यालय असलेले राष्ट्रवादी भवनही आता पाडण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेच्या कामासाठी हे कार्यालय नामशेष होणार आहे. 
कॉंग्रेसचे गांधी भवन व शिवसेनेचे शिवालय ही कार्यालयेही विस्थापित होणार आहेत. मात्र, कॉंग्रेसला दादरचे टिळक भवन, तर शिवसेनेला शिवसेना भवन ही कार्यालये आहेत. राष्ट्रवादीला मुंबईत एकही हक्‍काचे कार्यालय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची सर्वाधिक अडचण होणार आहे. 
राज्य सरकारने सर्व पक्षांना कार्यालयांसाठी विविध ठिकाणी तात्पुरती जागा दिली आहे. राष्ट्रवादीला बॅलार्ड पियरला ठाकरसी इमारतीत कार्यालय देण्यात आले आहे. मात्र, करारानुसार या नवीन कार्यालयाचे काम केले नसल्याने राष्ट्रवादीने आपल्या मूळ कार्यालयाचा ताबा सोडला नव्हता. त्यामुळे शनिवारी अचानक या कार्यालयाचे वीज-पाणी तोडण्यात आले.
राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या बैठका, पक्षाचा दैनंदिन कारभार या कार्यालयातूनच चालत असल्याने तो ठप्प झाला आहे. आता पक्षाचे कार्यालय तातडीने नवीन जागेत हलवणे किंवा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयाच्या समोरील बंगल्यातून कामकाज सुरू ठेवणे हाच पर्याय राष्ट्रवादीसमोर आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख