sharad pawar | Sarkarnama

पुरस्कार मिळाल्याने अजून लिहावेसे वाटते- शरद पवार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

औरंगाबाद : "पुरस्कार स्वीकारायला जाणे आणि तिथे जाऊन भाषण करणे हा माझा स्वभाव नाही. पण "लोक माझे सांगाती' या माझ्या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेने पुरस्कार दिला. लिहिल्यावर पुरस्कार मिळतो म्हटल्यावर मला अजून लिहावे वाटते. पण मी पुस्तक लिहायला लागलो तर माझे लोक तुम्ही आता तेच करा म्हणतील' अशा मिश्‍कील शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

औरंगाबाद : "पुरस्कार स्वीकारायला जाणे आणि तिथे जाऊन भाषण करणे हा माझा स्वभाव नाही. पण "लोक माझे सांगाती' या माझ्या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेने पुरस्कार दिला. लिहिल्यावर पुरस्कार मिळतो म्हटल्यावर मला अजून लिहावे वाटते. पण मी पुस्तक लिहायला लागलो तर माझे लोक तुम्ही आता तेच करा म्हणतील' अशा मिश्‍कील शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कार शरद पवार यांच्या "लोक माझे सांगाती' या ग्रंथाला तर नटवर्य लोटू पाटील पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा सुरुवातीलाच शरद पवारांनी उल्लेख केला. खान्देश, विदर्भ, कोकणातील भाषेचा वेगळाच बाज असतो, सोलापूर, कोल्हापूर, सातारा भागातील भाषेला वेगळीच धार असते. पुण्याची भाषा विद्वत्तेचा मक्ता जणू आमच्याकडेच आहे असे दर्शवणारी असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला. तर मराठवाड्याच्या भाषेतून माणुसकीचे दर्शन घडते असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. भाषा आणि त्या त्या भागातील लोकांच्या स्वभावांचे रंजक किस्से सांगत पवारांनी उपस्थितांना मनसोक्त हसवले. डॉ. जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल नाटकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला विरोध, गनिमी काव्याने सगळ्या कलावंतांना विमानाने 
मुंबईत पोचवल्याच्या जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतांना गेवराई-पैठण मार्गावर मुख्यमंत्र्याच्या गाडीला हात दाखवून थांबविल्यानंतर 60 वर्षाच्या माऊलीने कमरेच्या चंचीतून चांदीचा शिक्का काढून तो यशवंतरावांच्या हातावर ठेवला. तुम्ही करत असलेल्या राज्याच्या विकासात हा माझा वाटा असल्याचे सांगत तिने मराठवाड्यातील माणुसकीचे दर्शन घडवले होते याची आठवण करून द्यायलाही शरद पवार विसरले नाहीत. 

पन्नास वर्षाच्या वाटचालीची प्रेरणा माझी आई 
माझ्या राजकीय वाटचालीला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदासह केंद्रात मंत्री झालो, 14 निवडणुका लढलो आणि सुदैवाने एकही हरलो नाही. या सगळ्या मागे जर कुणाची प्रेरणा होती तर ती माझ्या आईची होती हे शरद पवारांनी आवर्जून सांगितले.

ज्या काळात महिला कधीच राजकारणात नव्हत्या तेव्हा माझी आई कॉंग्रेसच्या चळवळीत काम करायची. तेव्हाच्या डिस्ट्रीक लोकल बोर्डाच्या निवडणुकीत महिला उमेदवार मिळत नसल्याने पक्षाने माझ्या आईला निवडणूक लढवायला सांगितली. ती निवडून आली आणि पुण्यात एका बैठकीसाठी तिला बोलावलं. चार दिवस आधीच ती बाळंतीण झाली होती. चार दिवसांच्या बाळाला घेऊन पुण्यात गेली आणि बैठकीला हजर राहिली. तेव्हा चार दिवसांची बाळंतीण बाई आपल्या बाळाला घेऊन बैठकीला येते याचा आदर्श सगळ्यांनी ठेवा असे लोकल बोर्डाचे त्यावेळचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी सगळ्यांना सांगितले. त्या बाईच्या कवेत चार दिवसांचे बाळ होते, त्याचे नावं शरद पवार असे सांगत पवारांनी आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. यावेळी संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या वाक्‍याला दाद दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख