shantigiri maharaj aurangabad | Sarkarnama

वेरुळच्या आश्रमात शांतिगिरी महाराजांच्या आर्शिवादासाठी राजकारण्यांची रीघ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

औरंगाबाद : जगद्‌गुरु जनार्दन स्वामी महाराज (बाबाजी) यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथील आश्रमात "जय बाबाजी धर्म संस्कार सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. वेरुळच्या आश्रमाचे मठाधिपती महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या सोहळ्यात त्यांचे आर्शिवाद घेण्यासाठी राजकारण्यांची सध्या रीघ लागली आहे. मराठवाडा, उत्तर-पश्‍चिम महाराष्ट्रासह खान्देशात शांतिगीरी महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. हे लक्षात घेता आगामी निवडणुकीत महाराजांचा कृपाशिर्वाद आपल्याला मिळावा यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून आश्रमात येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची संख्या अचनाक वाढली आहे. 

वेरूळ आश्रमाचे मठाधिपती शांतीगीरी महाराज यांनी स्वतः 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राजकारणात उडी घेतली होती. तेव्हा एक लाख साठ हजाराहून अधिक मते मिळवत त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना हादरा दिला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्याच्या राजकारण प्रवेशाने अनेकांचे धाबे दणाणले होते. आगामी 2019 मध्ये देखील शांतीगीरी महाराज पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. शांतीगीरी महाराज व जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या ही अनेक मतदारसंघाचे राजकीय गणित बदलून टाकणारी ठरू शकते. याची जाणीव असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी धर्म संस्कार सोहळ्याच्या निमित्ताने वेरूळ आश्रम पर्यायाने शांतीगीरी महाराजांकडे धाव घेतल्याचे दिसून येते. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, पश्‍चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यात बाबाजींचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. ही मते आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळाले तर विजय निश्‍चित असल्याचे बोलले जाते. 

इच्छुकांची भाऊगर्दी... 
13 ते 20 डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या धर्मसंस्कार सोहळ्यात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छूकांचीच गर्दी अधिक दिसते. वेरूळच्या आश्रमात येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, जालन्याचे आमदार व राज्यमंत्री अर्जून खोतकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार सुभाष झांबड, शिवसेनेचे संजय सिरसाट यांचा समावेश आहे. 

राज्यातील मंत्री, नेतेही येणार 
या शिवाय नाशिक, नगर, धुळे, जळगांव जिल्ह्यातील अनेक आजी-माजी आमदार, राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील वेरूळच्या आश्रमात हजेरी लावली. वीस डिसेंबर रोजी धर्मसंस्कार सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी राज्यातील अनेक नेते, मंत्री शांतीगीरी महाराजांच्या दर्शनासाठी येणार असल्याचे मठातील सुत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख