विहिंपच्या हुंकार सभेत शांतीगिरी महाराजांनी आळवला "मोदी राग'

 विहिंपच्या हुंकार सभेत शांतीगिरी महाराजांनी आळवला "मोदी राग'

औरंगाबाद : वेरूळ येथील जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांनी विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत छोटेखानी भाषण केले. " नरेंद्र मोदी हे भगवंताचा अवतार आहेत, ते या देशाचे पंतप्रधान आहेत, हे आपले भाग्य' असल्याचा " मोदी राग ' त्यांनी आळवला. व्यासपीठावर उपस्थित साधू-संतांपैकी कुणीच आपल्या आर्शिवचनात मोदींचा उल्लेख केला नव्हता. पण पाच मिनिटांच्या भाषणात शांतिगिरी महाराजांनी मात्र मोदींचाच उल्लेख केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज यांचा मराठवाडा, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मोठा भक्त परिवार आहे. अध्यात्मिक आणि धार्मिक प्रबोधनाचे कार्य करत असतांनाच 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे उडी घेतली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत जोरदार प्रचार आणि भक्त परिवाराच्या ताकदीवर शांतिगिरी महाराजांनी तब्बल 1 लाख 62 हजार मते मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला होता. परंतु या निवडणुकीत महाराजांच्या वाट्याला पराभव आल्यामुळे त्यांनी राजकारण न करता धर्मकार्यच करावे असे मत त्यांच्या भक्तांनी व्यक्त केले होते. परिणामी 2014 मध्ये शांतिगिरी महाराजांनी मौन धारण करत निवडणुकीतून अंग काढून घेतले होते. 

आगामी निवडणुकीसाठी पुन्हा दंड थोपटले 
गेल्या निवडणुकीत ब्रेक घेतल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार जाहीर केला आहे. साधारणात 8-10 महिन्यापुर्वी आगामी लोकसभा निवडणुक शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमधील महत्वाचे मंत्री डॉ. महेंद्र सिंग यांनी मराठवाड्यात उमेदवारांची चाचपणी करत भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिले होते. 

दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण आगामी लोकसभा भाजपकडून लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वेरूळच्या आश्रमात भाजपच्या बड्या नेत्यांच्या चकरा देखील वाढल्या. त्यामुळे भाजपकडून शांतीगिरी महाराज हेच उमेदवार असतील अशा चर्चांना उधाण आले होते. कालांतराने ही चर्चा काहीशी मागे पडली. काहीही झाले, कितीही वाद झाले तरी शिवसेना-भाजप लोकसभा तरी एकत्रित लढतील या चर्चांनी पुन्हा जोर धरला आणि शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारी मिळण्या आशा माळवल्या. 

त्यामुळे भाजपने उमेदवारी दिली नाही, तर महाराज अपक्ष निवडणूक लढवतील असा अंदाज देखील व्यक्त केला जाऊ लागला. त्यातच औरंगाबाद की नाशिक लोकसभा अशी चर्चा देखील महाराजांच्या समर्थकांकडून सुरू झाली. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांनाच पुन्हा राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट अयोध्येत जाऊन केंद्रात व राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार असतांना राम मंदिर का बांधले नाही ? याचा जाब मोदी सरकारला विचारला. त्यामुळे सध्या भाजप- शिवसेनेतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढतील अशी चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू झाली आहे. त्याचच परिणाम म्हणून की काय विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत शांतीगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळत त्यांना थेट भगवंताच्या अवताराची उपमा दिली. एकंदरीत हुंकार सभेत मोदी राग आळवल्यामुळे शांतीगिरी महाराजांच्या भाजप उमेदवारीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com